‘काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत, त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:56 PM2019-03-06T23:56:29+5:302019-03-06T23:57:05+5:30
काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद : काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.
जीवन विकास ग्रंथालयाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘काश्मिरियत व भारतीयत : एकाच नाण्याच्या दोन बाजू’ या विषयावर ते सायंकाळी जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी होते.
लक्ष्मीकांत देशमुख यांची नजीकच्या काळात काश्मीर प्रश्नावर कादंबरी येणार आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीर प्रश्नाचा अभ्यास गांभीर्याने सुरू केला आहे. काश्मीरवर घरी एक कपाटभर पुस्तके असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, भारत धर्मनिरपेक्ष राहिला, तरच काश्मीर धर्मनिरपेक्ष राहील. काश्मिरात काश्मिरियत जोपासली गेली पाहिजे. भारतमातेचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरची प्रतीके पुढे आणली पाहिजेत. हरी पर्वत हे काश्मीरचे जिते जागते प्रतीक होय. हिंदू, बौद्ध, शीख आणि इस्लाम धर्माचा सुंदर मिलाफ काश्मिरात बघायला मिळतो. काश्मिरी भारतीयच आहेत, असे साऱ्या भारतीयांनी मानले पाहिजे. स्वतंत्र काश्मीरची कल्पना मुळीच शक्य नाही. भारताच्या संरक्षणासाठीही स्वतंत्र काश्मीर परवडणार नाही. धर्मनिरपेक्ष भारत... धर्मरिपेक्ष काश्मीर हेच खरे उत्तर होय.
काश्मीर प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. त्यासाठी खूप मोठा त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागेल. काश्मिरी लोकांशी संवाद वाढवला गेला पाहिजे व काश्मिरी माणसाचा राग करणे सोडून दिले पाहिजे. काश्मिरी लोकांना भारतासोबत राहावे असेच वाटत असते. त्यामुळे तुम्ही आमचेच आहात, असा विश्वास त्यांना देत राहिले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.
काश्मीरची स्थापना कशी झाली. तिथे १४ व्या शतकानंतर इस्लाग कसा वाढत गेला. तिथली संत परंपरा व साहित्य परंपरा कशी होती, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
प्रारंभी, देशमुख यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. त्यानंतर रा.श. वालेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नितीन कंधारकर यांनी आभार मानले. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह भा.बा. आर्वीकर, अनेक प्रकाशक व जाणकारांची यावेळी मोठी उपस्थिती होती.