उमेदवारांची माहिती मतदारांपुढे ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:39 AM2017-10-04T00:39:02+5:302017-10-04T00:39:02+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगिक बाबींच्या नियमांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज येथे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगिक बाबींच्या नियमांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज येथे दिले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक व जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनुराधा ढालकरी, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सहारिया म्हणाले, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रामुख्याने उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या माहितीची अचूक तपासणीबरोबर उमेदवार करीत असलेल्या खर्चावरही नजर ठेवावी. त्यासाठी चित्रीकरण करावे व संबंधित विभागाच्या मदतीने पुरावे घ्यावेत. मतदान केंद्राच्या दर्शनी भागावर उमेदवारांची संपत्ती, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर व इतर माहिती संबंधीचा गोषवारा मोठ्या अक्षरात मतदारांना स्पष्ट दिसेल या स्वरूपात लावावा.
मतदार जागृती करताना मतदानाची टक्केवारी वाढविण्यावरही भर द्यावा, मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी, आदी सूचना त्यांनी दिल्या. आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी संबंधित यत्रणांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांना मतदान करता यावे अशी व्यवस्था करावी. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समन्वयाने पार पाडावी, असे सांगितले.
सचिव शेखर चन्ने यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व मतदारांना व्होटर्स स्लीप वाटप शंभर टक्के करावे. सिंगल विंडो सिस्टीमद्वारे उमेदवारांना आवश्यक परवानगी देणे. तसेच उमेदवार व पक्षांचा निवडणूक खर्चाची माहिती, आचारसंहिता कक्ष, नियंत्रण कक्ष, मतदान केंद्र व्यवस्था, मतदार यादी, मीडिया सेंटर आदींविषयी आढावा घेऊन विविध सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसंबंधी माहिती दिली तर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात निवडणूक काळातील बंदोबस्ताबाबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या विविध आदेशांचे संकलन केलेल्या पुस्तिकेचे विमोचन सहारिया यांच्या हस्ते करण्यात आले.