- विजय सरवदे
औरंगाबाद : प्रगत अभियांत्रिकीलाही लाजवील अशा खडकी व आताच्या औरंगाबादेतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ‘नहर- ए-अंबरी’ ही सुविधा महापालिका आणि पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ‘खडकी’ या नावाने या शहराची ओळख होती. मलिक अंबरने या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी ‘सायफन’ या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करीत अतिशय कल्पकतेने हर्सूल-सावंगीच्या टेकड्यांपासून रोजाबागपर्यंत भूमिगत कालवा अर्थात मुख्य १२ नहरींद्वारे पाणी आणले. तेथून पुढे खापराच्या पाईपलाईनद्वारे शहराला पाणी वितरण केले. नहरींतील पाणी खळाळून वाहण्यासाठी जमिनीवर उंच मनोरे (मेन होल) उभारण्यात आले होते.
आज मात्र, ठिकठिकाणी नहरींची तोडफोड व अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे मूळ नहरी हरवून जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतिहास जपला व तो जोपासला पाहिजे. पण, औरंगाबादकरांना त्याचा विसर पडलेला दिसतो. या नहरींवर अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. कुठे नहरी, तर कुठे तिचे मेन होल फोडून पाणी घेतले जाते. रोजाबाग, हर्सूल, बीबी का मकबरा आदी परिसरात अनेकांनी नहरींवरच घरे उभारली आहेत. सावंगीच्या टेकडीपासून साडेपाच किमीपर्यंत लांब अशा या मुख्य बारा नहरी रोजाबागपर्यंत, तर तेथून पाणचक्कीपर्यंत ७ किमी नहरीचा प्रवास आहे.
कोणतीही ऊर्जा न वापरता केवळ गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे या नहरीचे शाश्वत, शुद्ध पाणी दोन ते अडीच लाख औरंगाबादकरांची तहान भागवत होते. सध्या औरंगाबादकरांना जायकवाडी धरणापासून पंपिंग करून पाणी आणले जाते. विजेच्या बिलापोटी मनपाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही. मनपाने नहरींचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन केल्यास नहरीच्या शाश्वत व शुद्ध पाण्याच्या माध्यमातून जुन्या शहरातील नागरिकांची तहान भागवता येऊ शकते.
संशोधन व प्रेरणेचा विषय आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात मोठमोठी धरणे किंवा पाणीपुरवठा योजनेसाठी सायफन पद्धतीचा वापर केला जातो. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी ‘नहर- ए-अंबरी’ हा संशोधन व प्रेरणेचा विषय आहे. या नहरी जपल्या पाहिजेत. एक ऐतिहासिक ठेवा म्हणून तरी मनपा व पुरातत्त्व विभागाने याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. - प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय
२५ % नागरिकांसाठी मुबलक पाणीनहरींवरील अतिक्रमणे काढून ठिकठिकाणी भूमिगत जलकुंभ उभारून त्यात पाण्याची साठवण करावी. नहरींचे तुंबलेले झरे मोकळे करावेत. नहरींच्या पाण्याचा वापर झाल्यास शहरातील २५ टक्के नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते. - सुनील देशपांडे, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशन.