औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात; सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:18 PM2018-08-23T12:18:23+5:302018-08-23T12:22:21+5:30
अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली असून, यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, कडधान्य, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन, गळीत धान्य, कापूस, ऊस आदीची लागवड करण्यात आली आहे. साडेपाच लाख हेक्टरवर या पिकांची पेरणी झालेली आहे. फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर उर्वरित औरंगाबाद, सोयगाव आणि वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच्या डीपीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीकडे लक्ष वेधले होते. वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांतील खरीप हंगामाच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. दरमहा पिकांच्या आढाव्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडे दुष्काळासंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे.
३० आॅक्टोबरपर्यंत शासन खरीप हंगामाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. शासनाने याबाबत एक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार तालुकानिहाय पिकपाण्याची माहिती शासनाकडे पाठवावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी शासनाकडे पाठविण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
३४० गावांत ३७८ टँकर
जिल्ह्यातील ३४० गावांत ३७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर जालना जिल्ह्यातील ३२ गावांत ४७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ४४४ टँकर सुरू आहेत. यावरून पिण्याच्या पाण्याची अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज येतो. पावसाचा टक्का वाढला असला तरी भूजल पातळीत वाढ झाली नसल्यामुळे पाण्याचे संकट कायमच आहे. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही तीच परिस्थिती आहे. सध्या होत असलेल्या पावसाचा खरीप हंमागाला फारसा लाभ होणार नाही, असेच चित्र आहे.