औरंगाबाद : अनेक दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दुबारपेरणीचे संकट आ वासून उभे होते. मात्र, वरुणराजाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ( Kharif crops get life saving as rain re-renter in Marathwada )
परभणी जिल्ह्यात १५ दिवसांच्या खंडानंतर बुधवारी रात्री झालेल्या भिज पावसामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्याच्या ग्रामीण भागात ४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाभरात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती.
१६ व्या दिवशी बरसलाकौठा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात पेरणीनंतर पाऊस गायबच झाला होता. तब्बल १६ व्या दिवशी पाऊस बरसला. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, हळद इत्यादी पिके अक्षरशः वाळत होती. अगोदरच मागील वर्षापासून सतत कोरोना, टाळेबंदी, पिकांना भाव नाही अशा संकटांनी शेतकरी व सर्वसामान्य माणूस वैतागून गेला आहे. त्यातच आता पुन्हा पाऊस वेळेवर नसल्याने नवेच संकट उभे राहिले होते.
नांदेड जिल्ह्यात ३६.२ मि.मी. पाऊसनांदेड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५९ मि.मी. पावसाची नोंद भोकर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा केली जात होती. बुधवारी रात्री उशिरा पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २७३ मि.मी. पाऊस झाला आहे.