खरिपाची उत्पादकता घटणार
By Admin | Published: August 29, 2014 11:48 PM2014-08-29T23:48:41+5:302014-08-30T00:01:21+5:30
यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.
नांदेड: मागील तीन वर्षांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन जिल्ह्यातील कपाशी व सोयाबीनच्या उत्पादकतेत दुपटीने वाढ झाली होती, परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.
दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने महसूल मंडळ स्तरावर काही गावांची निवड करुन तालुकानिहाय, पीकनिहाय पीककापणी प्रयोग घेतले जातात. यावरुन पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले का कमी झाले हे स्पष्ट होते. कृषी कार्यालयाने २००९-१० मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन कपाशीचे हेक्टरी उत्पन्न ५ क्विंटल २७ किलो एवढे निघाले, तर सोयाबीनचे ४ क्विंटल ३७ किलो ऐवढे आले होते. यानंतर २०११-१२ मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगात कपाशीच्या हेक्टरी क्षेत्रात तीन क्विंटलने वाढ होवून ८ क्विंटल ५७ किलोवर पोहोचले.
तर सोयाबीनचे उत्पन्न दुपटीने वाढून १२ क्विंटल ५४ किलोवर पोहोचले. यानंतर २०१२-१३ या वर्षात अल्पश: पावसामुळे सोयाबीन, कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी म्हटले तरी कृषी विभागाने घेतलेल्या पिक कापणी प्रयोगावरुन कपाशीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ९ क्विंटल ४६ किलो झाले आहे. तसेच सोयाबीनचे उत्पन्न १५ क्विंटल ४४ किलो निघाल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे वरील आकडेवारीवरुन गेल्या तीन वर्षांत सोयाबीन, कपाशीच्या उत्पादकतेत सरासरी दुपटीने वाढ झाल्याचे दिसते.
यंदा कापूस, सोयाबीनसह अन्य सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने उत्पादकताही निम्यावर येईल, की नाही हे सांगणे कठीण आहे. (प्रतिनिधी)