शालेय पोषण आहारात तूरडाळ नसल्याने खिचडी बेचव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:02 AM2021-02-05T04:02:26+5:302021-02-05T04:02:26+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी ...
औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी बेचव झाली. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना बसला आहे.
ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत दिली जाणारी खिचडी बंद करण्यात आली. त्याऐवजी मुलांना धान्य घरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वितरणामध्ये कडधान्य गायब झाल्याचे दिसून आले आहे.
शासनाच्या धोरणानुसार २००३ पासून मान्यताप्राप्त व जि. प. शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा आणि मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता. यानुसार आजपर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाकाळात पोषण आहारात बदल झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ दिला जातो. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूगदाळ व तांदूळ दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ ते ८ पर्यंतच्या शाळांची संख्या ३०७१ आहे.
------
कोरोनाकाळात तांदूळ दिला पण...
शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ बनवून खाणे हे विद्यार्थ्यांना रुचकर लागत नाही. तर ग्रामीण भागातही तूरडाळ मिळत नसल्याने खिचडीची चवच निघून गेली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य मीठ, मिरची पावडर, जिरे, हळद, गोडतेल हे देखील देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरात ही खिचडी बनलीच नाही.
-------
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ४,४९,९११
शहरी लाभार्थी : १,०६,३००
ग्रामीण लाभार्थी : ३.४२,६११
--------------
कोट :
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत जून २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत तांदूळ व मूगडाळीचा पुरवठा करण्यात आला. तर शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कडधान्याचा पुरवठा केला जाईल.
- भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार, लेखाधिकारी जि. प.