तरुणीचे अपहरण
By Admin | Published: December 20, 2015 11:41 PM2015-12-20T23:41:56+5:302015-12-20T23:54:41+5:30
औरंगाबाद : पुणे येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट पदावर कार्यरत असलेल्या औरंगाबादेतील तरुणीचे तिच्या सहकारी तरुणानेच अपहरण केल्याची तक्रार समोर आली आहे.
औरंगाबाद : पुणे येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट पदावर कार्यरत असलेल्या औरंगाबादेतील तरुणीचे तिच्या सहकारी तरुणानेच अपहरण केल्याची तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
राजेश फलके (रा.औरंगाबाद) असे आरोेपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक जारवाल यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रेणुकामातानगर येथील मुलगी ९ महिन्यांपूर्वी पुणे येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट पदावर नोकरी करीत आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या राजेश फलकेसोबत तिची ओळख झाली. या ओळखीतून दोघेही एकमेकांना भेटत असत.
शिवाय ते ८ डिसेंबर रोजी दोघेही औरंगाबादेत येऊन गेले. ८ डिसेंबरनंतर काही दिवस फलके आणि ती तरुणी तक्रारदाराशी अधूनमधून फोनवर बोलत असत. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक त्यांनी आम्ही लग्न केल्याचा मेसेज तक्रारदारास पाठविला. तेव्हापासून त्यांचे मोबाईल बंद लागत आहेत. त्यामुळे तक्रारदाराने संबंधित कंपनीत जाऊन पाहणी केली असता फलके आणि त्यांची मुलगी त्यांना तेथे भेटली नाही. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी १९ डिसेंबर रोजी रात्री पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.