छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा जाळपोळ प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) हाती घेतला आहे. चौथ्या दिवसापर्यंत एकूण ३२ आरोपींना अटक करण्यात आली. रविवारी १४ जणांना न्यायालयात हजर केले असता ११ जणांना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तीनजणांना न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे हर्सुल कारागृहात रवानगी केल्याची माहिती एसआयटीचे प्रमख पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
शेख अझहर शेख मझहर (वय २८, रा. गल्ली क्र. ९, रहेमानिया कॉलनी), शेख समीर शेख मुनीर (२३, रा. गल्ली क्र. ११, संजयनगर), शेख समीर शेख हसन (२२, रा. कटकट गेट), तालेबखान साजेदखान (२६, रा. अराफत मशीदजवळ, किराडपुरा), सय्यद अलीम सय्यद शौकत (३२, रा. अनस मशिदीसमोर, किराडपुरा), साेहेल खान कबीर खान (२४, रा. गल्ली क्र. १९, बायजीपुरा), सय्यद सद्दाम सय्यद जकी (२३, रा. यासीननगर, हर्सूल, गल्ली क्र.१), शेख मोहसीन शेख जफर (३३, रा. गल्ली क्र.३४, बायजीपुरा), शेख असद शेख अश्पाक (२१, रा. गल्ली क्र. ७, सासीन मशिदीजवळ नेहरूनगर), शेख रियाज शेख जहुर (३५, रा. गल्ली क्र. ९, बायजीपुरा), सय्यद शोएब सय्यद शफीक (३८, रा. आयेशा हॉलच्या गल्लीत, रहेमानिया काॅलनी) यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, तर सय्यद बाबर सय्यद कफिलोद्दीन (३०, रा. किराडपुरा), मोहंमद इलियास ऊर्फ इल्लू जहुर (३६, रा. चमचमनगर, नारेगाव) आणि मोहंमद नासेर ऊर्फ इन्ता मोहमद फारुख (३१, रा. नूर कॉलनी, भडकलगेट) या तिघांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारपर्यंत १९ आरोपींना अटक केली होती. आता हा आकडा ३२ वर पोहोचला आहे. त्याचवेळी ओळख पटविलेल्या आरोपींची संख्या ८० पेक्षा अधिक झाली आहे. अटक आरोपींमधील अनेकजण रेकॉर्डवरील असल्याचे समोर येत आहे. एसआयटीमध्ये पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, राहुल चव्हाण, कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, हवालदार अरुण वाघ, सुनीज जाधव, संजय गावंडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.