लाडसावंगी : म्हणतात ना की ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे येणाऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी न डगमगता मात केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे लाडसावंगी येथील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले. या शेतकऱ्याने दुष्काळात डाळिंबासाठी अथक परिश्रम घेतले आणि आज डाळिंबाला सोन्यासारखा भाव मिळाला आहे.
लाडसावंगी परिसर एकेकाळी मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे; परंतु २०१२ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे परिसरातील बहुतांशी बागा वाळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर त्या तोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर लाडसावंगी, शेलूद, चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकाना, पिपंळखुंटा, सय्यदपूर, औरंगपूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा उभारल्या.आता हा परिसर डाळिंब झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोसंबीला फळे येण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागतो, तर डाळिंबाला दीड ते दोन वर्षांतच फळे लागतात. शिवाय मोसंबीपेक्षा डाळिंबाला पाणीही कमी लागते. त्यामुळे लाडसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा पाहायला मिळतात.
भर उन्हाळ्यात सगळीकडे तीव्र पाणीटंचाई असताना या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन डाळिंबाच्या बागा जोपासल्या. आता फळे विक्रीसाठी आली असून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना आदी बाजारपेठांमध्ये ती दाखल होत आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत डाळींबांना पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने लाडसावंगी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाडसावंगी परिसरात गेल्या तीन महिन्यांत एकही मोठा पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाची मका, बाजरी, मूग, उडीद, कापूस ही पिके मात्र, शेवटच्या घटका मोजत आहेत.
दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न अनिल पवार या शेतकऱ्याने मुंबई येथे ३० व ३१ आॅगस्ट रोजी डाळिंब विक्रीसाठी नेले. तेव्हा त्यांच्या पाचशे ग्रॅम वजन असलेल्या डाळिंबाला तब्बल २५० रुपये किलो, दोनशे ग्रॅम वजनाच्या डाळिंबाला १५० रुपये किलो, तर डागाळलेल्या डाळिंबाला ५० रुपये किलो असा भाव मिळाला. एक एकर क्षेत्रात घेतलेल्या डाळिंबाला दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजून अर्ध्याच्या वर माल बाकी असल्याचे पवार यांनी सांगितले.