नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच डाव्यांचा सक्रिय सहभाग होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:34 PM2019-01-03T16:34:41+5:302019-01-03T16:35:30+5:30
सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत.
विद्यापीठ नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच भाकप, डावे पक्ष व त्यांच्या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत. मी स्वत: येरवड्याच्या कारागृहात वीस दिवस होतो, असे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विधिज्ञ कॉ. मनोहर टाकसाळ यांनी सांगितले.
नामांतराच्या यंदाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी सांगितले की, लढा नामांतरासाठी होता; पण प्रत्यक्षात नामविस्तार झाला. तडजोडीने हा लढा संपला. समतेकडे एकेक पाऊल टाकणारा हा नामांतर लढा होता; परंतु मराठवाड्याच्या काही धुरिणांनी नामांतरास विरोध केला आणि त्यात मराठवाड्यात दलितांच्या घरादारांची राखरांगोळी झाली. अनेक जण शहीद झाले. खंत वाटते ती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातदेखील डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे कृतीने जतन होत आहे, असे दिसत नाही. या विद्यापीठातही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेतमजूर राबराब राबतात. त्यांचे वेतनही महिनोन्महिने मिळत नाही.
१६ वर्षे लढा लढूनही नामविस्तार झाला. समतेचे स्वप्न स्वप्नच राहिले. कॉ. चंद्रगुप्त चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाकप व डाव्या पक्ष-संघटनांचा या लढ्यात प्रारंभापासून मोलाचा सहभाग होता. तत्कालीन पँथर नेते गंगाधर गाडे यांनी नामांतरासाठी सह्यांची मोहीम सुरू केली होती. त्यावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. व्ही.डी. देशपांडे यांची व माझी सही होती. मनमाड येथे भाकपची राज्य परिषद झाली. त्यावेळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नामांतराचा ठराव संमत केला होता.
मुंबईच्या अंधेरीत शेकडो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. त्यात माझ्यासमवेत कॉ. भाऊलाल टेलर, भाई शरद गव्हाणे, रतनकुमार पंडागळे, अॅड. रमेशभाई खंडागळे, साथी सुभाष लोमटे आदीही येरवडा कारागृहात होते. बाजूच्या बरॅकमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धुळ्याचे चौरासिया यासारखे नेतेही होते. लक्षात राहिलेला आणखी एक प्रसंग असा की, भेंडाळा येथून पोलिसांना चकवा देऊन शेताशेतातून आम्ही लाँगमार्च काढला. पुढे छावणीजवळ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, या आठवणींना कॉ. टाकसाळ यांनी उजाळा दिला.
त्यांनी आणखी सांगितले की, औरंगाबाद मतदारसंघातून त्याकाळी मी आमदारकीची निवडणूक लढवली होती. भाकपच्या तिकिटावर मी उभा होतो; पण अन्य कोणत्याही उमेदवाराने नामांतराला पाठिंबा जाहीर केला नव्हता. मात्र, मी जाहीरपणे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे, ही भूमिका घेऊन निवडणूक लढवली.
( शब्दांकन : स.सो. खंडाळकर )