‘रोजगार हमी’कडे मजुरांची पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 11:17 PM2017-01-03T23:17:39+5:302017-01-03T23:21:48+5:30
लातूर दुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़
आशपाक पठाण लातूर
दुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़ २ लाख ४ हजार ३९६ नोंदणीकृत मजूर असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ एकच काम सुरू आहे़ टंचाईचा काळ वगळता अन्य वेळेत या कामाची कोणी मागणी करीत नसल्याने ब्रेक आहे़
दुष्काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हजारो विहिरी मंजूर करण्यात आल्या़ गेल्या तीन वर्षांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध होईल आणि मजुरांनाही रोजगार मिळेल या हेतूने ३ हजार ७६८ विहिरींचे काम सुरू करण्यात आले होते़ यातील बहुतांश विहिरीचे काम ८० टक्के झाले असून काही विहिरींचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहेत़ पाऊस चांगला पडल्याने काम करता येत नसल्याने सर्वच विहिरींचे सध्या काम बंद आहेत़ दुष्काळात विहिरीबरोबरच रस्ते, नाला बल्डिंग, वनीकरण आदी कामांतून आठवड्याला जवळपास २० ते २५ हजार मजुरांना रोजगार मिळत होता़ यंदाच्या पावसाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाला जणू पूर्णविराम दिला़ सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नद्या, नाले, वाहिले़ विंधन विहिरी, विहीर, लघु, मध्यम प्रकल्पात पाणी असल्याने शेतीची कामे प्रगतीपथावर आहेत़ शेती कामासाठी महिला मजुरांना १५० ते २०० व पुरूषांना ३०० ते ४०० रूपये रोजगार असल्याने सरकारी कामाची मजुरांना आवश्यकता नसल्याचे चित्र आहे़ गावात कामे उपलब्ध असल्याने मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवली आहे.