मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्तेकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:32 AM2018-04-05T00:32:56+5:302018-04-05T00:33:45+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारणसह विद्याशाखेनुसार ९ प्रकारचे वर्गीकरण केले होते. मराठवाड्यात ७५० हून अधिक महाविद्यालये असताना फक्त ८९ महाविद्यालयांनी या गुणवत्ता यादीमध्ये सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे.
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारणसह विद्याशाखेनुसार ९ प्रकारचे वर्गीकरण केले होते. मराठवाड्यात ७५० हून अधिक महाविद्यालये असताना फक्त ८९ महाविद्यालयांनी या गुणवत्ता यादीमध्ये सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात केवळ औषधनिर्माण प्रकारात औरंगाबादच्या वाय.बी. चव्हाण औषधनिर्माण महाविद्यालयाला देशात ३४ वे स्थान मिळाले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय मागील तीन वर्षांपासून उच्च शिक्षण देणाºया संस्थांची गुणवत्ता यादी जाहीर करीत आहे. मागील वर्षी या प्रक्रियेवर शंका घेतल्यामुळे यावर्षी विशेष खबरदारी घेतली आहे. मराठवाड्यात औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, एमजीएम वैद्यकीय अभिमत विद्यापीठ, मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टचे इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट ही विद्यापीठे आहेत. यातील दोन विद्यापीठे राज्य सरकारने स्थापन केलेली आहे, तर उर्वरित दोन विद्यापीठे अभिमत आहेत. विद्यापीठांशी मराठवाड्यात ७५० पेक्षा अधिक महाविद्यालये संलग्न आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहेत. या सर्व संलग्न महाविद्यालय आणि विद्यापीठ मिळून केवळ ८९ शैक्षणिक संस्थांनीच राष्ट्रीय गुणवत्ता स्पर्धेत भाग घेतला आहे. सर्वसाधारण, विद्यापीठ, विधि, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्ट, व्यवस्थापन आणि महाविद्यालय या नऊ गटांत केवळ एका महाविद्यालयाला क्रमांक मिळाला आहे. औषधनिर्माण गटात रफिक झकेरिया कॅम्पसमधील वाय. बी. चव्हाण औषधनिर्माण महाविद्यालयाने देशात ३४ वा क्रमांक पटकावला. मात्र, मागील वर्षी हेच महाविद्यालय २४ व्या स्थानावर होते. त्याची १० क्रमांकाने घसरण झाली आहे, हे विशेष. याशिवाय विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालये, पारंपरिक महाविद्यालयांना कोठेही स्थान मिळालेले नाही.
वाय. बी. चव्हाण औषधनिर्माण
महाविद्यालयाने राखली लाज
मराठवाड्यातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालयाला एकूण नऊ प्रकारांमध्ये कोठेही स्थान मिळाले नाही. यास अपवाद ठरले केवळ औरंगाबादचे वाय. बी. चव्हाण औषधनिर्माण महाविद्यालय. या महाविद्यालयाला औषधनिर्माण गटात देशात ३४ वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय याच प्रकारात शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, औरंगाबाद आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज आॅफ फार्मसी या दोन महाविद्यालयांना क्रमांक मिळाला नाही. मात्र, त्यांचा समावेश ७५ ते १०० या गटांत झाला आहे. महाविद्यालय प्रकारात औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा समावेश १५१ ते २०० गटांत आहे, तर विद्यापीठ प्रकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश १०१ ते १५० या गटात आहे. उर्वरित सर्वसाधारण, अभियांत्रिकी, विधि, अर्किटेक्चर, वैद्यकीय आणि व्यवस्थापन प्रकारात एकाही संस्थेला क्रमांक आणि गटातही स्थान मिळाले नाही.
मराठवाड्यातील सहभागी संस्थांची आकडेवारी
प्रकार एकूण संस्था मराठवाडा
सर्वसाधारण ९५७ २४
विद्यापीठे —— ०२
अभियांत्रिकी ९०६ १३
महाविद्यालय १,०८७ ४३
व्यवस्थापन ४८७ ०६
औषधनिर्माण २८६ ०७
विधि ७१ ०२
अर्किटेक्चर ५९ ०१
वैद्यकीय १०१ ००
एकूण ३,९५४ ९८