अजिंठा, वेरूळ लेण्या उद्यापासून होणार खुल्या; ऑनलाईन नोंदणी द्वारे दिवसात २ हजार पर्यटकांनाच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 PM2020-12-09T16:18:09+5:302020-12-09T16:18:09+5:30
जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार
औरंगाबाद : कोरोनामुळे मार्च महिन्यातील २३ तारखेपासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद केली होती. ती सर्व पर्यटनस्थळे गुरुवारपासून (दि. १०) खुली करण्यात येणार आहेत. आज अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला. २५७ दिवसांनंतर नागरिकांना जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणींसह बीबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ल्यासह सर्व पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
राज्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्यात आलेली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद होती. पर्यटनस्थळे गुरुवारपासून खुली होणार आहेत. प्रवेश कार्यक्रमावेळी राज्यमंत्री सत्तार म्हणाले, मागील नऊ महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंद होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने व्यापारी, छोटे व्यावसायिक, गाईड, पर्यटक आदींचा विचार करत अटी व शर्तींसह अजिंठा लेणीमध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश देण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, मात्र येथील सर्व व्यापारी, छोटे व्यावसायिक यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीकोनातून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर कटाक्षाने करणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. येथील नियमांचे पालन जगभर जाणार असल्याने त्रिसूत्रीचा अवलंब आवश्यक आहे, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे. तसेच अजिंठा लेणी परिसरात असलेल्या व्यावसायिकांच्या अडीअडचणीही लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून होती मागणी : गाईडसह लहान-मोठे हॉटेल्स चालक, टॅक्सी व्यवसाय आणि पर्यटन सेवा देणाऱ्या संस्थांसह अनेकांच्या रोजगारावर मागील १० महिन्यांपासून कोरोनामुळे गदा आलेली आहे. स्थानिक पातळीवरील पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचना होत्या. पर्यटनस्थळावरील कर्मचारी, गाईड यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. आज बुधवारी (दि. ९) सर्व पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. मागील ९ महिन्यांपासून ती पर्यटनस्थळे बंद आहेत. आतमध्ये स्वच्छता झालेली नसेल. तसेच काही पक्षी, प्राणी आत असतील, तर त्यांना जेरबंद करावे लागेल. सगळी सुरक्षेची खबरदारी घेऊन पर्यटनस्थळांमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश खुला होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते.
मर्यादित पर्यटकांना प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यक
जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार असून, दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार, अशा २ हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणी करता येईल. पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकीट मिळणार नाही.
बस फेऱ्या वाढविण्याचे आदेश
मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी, तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागाने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ, अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.