हुंड्यासाठी पत्नीला पेटवून देऊन खून करणाऱ्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:23 PM2020-11-25T13:23:25+5:302020-11-25T13:26:21+5:30
लग्नात हुंडा दिला नसल्यामुळे पती आणि सासू छळ करित होते.
औरंगाबाद : हुंड्यासाठी पत्नी मनिषाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून पेटवून तिचा खून करणारा अशोक अण्णा मोरे (३५, रा. गुरुदत्त नगर, गारखेडा परिसर) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. टेकाळे यांनी सोमवारी (दि.२३) जन्मठेपेची शिक्षा आणि २ हजार रुपये दंड ठोठावला.
घटनेच्या साडेतीन वर्षांपूर्वी मनिषाचे लग्न अशोक मोरे याच्याशी झाले होते. त्यांना २ मुली आहेत. लग्नात हुंडा दिला नसल्यामुळे पती आणि सासू नर्मदाबाई मनिषाचा छळ करित होते. २४ जानेवारी २०१६ च्या रात्री याच कारणावरुन मनिषाला बेदम मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी अशोक दारु पिऊन आला. मनिषाने त्याला जाब विचारला असता अशोकने मारहाण करून रॉकेल अंगावर ओतून मनिषाला पेटवून दिले. मनिषाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि नायब तहसीलदारांनी मनिषाचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. त्यावरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचार सुरु असतांना ३१ जानेवारी २०१६ रोजी मनिषाचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. डी. जारवाल यांनी केला होता.
अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतिष मुंडवाडकर यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणी अंती न्यायालयाने अशोकला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि २ हजार रुपये दंड आणि मारहाणीच्या आरोपाखाली ६ महिने सक्त मजुरी आणि ५०० रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार भानुदास कोलते यांनी सहकार्य केले.