औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेने मराठवाड्यातील उमेदवार यादी प्रसिद्ध केली. यात शिवसेनेने उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड आणि भाजपने लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली नाही. दोन्ही विद्यमान खासदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. दरम्यान, दोघांनीही पक्षाचा निर्णय मान्य असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पडू असे स्पष्ट केले आहे.
शिवेसनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, हिंगोली आणि उस्मानाबाद या मतदारसंघात नवीन चेहरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये, उस्मानाबादसाठी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे. तर, हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. खा. गायकवाड यांची वाद्ग्रस्थ प्रतिमा यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यासोबतच भाजपने सुद्धा लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना धक्का देत त्यांना उमेदवारी नाकारली. सुनील गायकवाड यांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे संबंध सुरळीत नसल्याने त्यांना याचा फटका बसल्याचे बोले जात आहे.
का कापली उस्मानाबादमधून गायकवाडांची उमेदवारी ?महाराष्ट्र सदनात रोजेकऱ्यासोबत झालेला वाद, त्यानंतर विमान कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर खासदार रवी गायकवाड देशभर चर्चेत आले. मतदारसंघात ‘नॉट रिचेबल खासदार’ अशीच चर्चा त्यांच्या पदरी पडली़ खासदार निधी पूर्ण खर्च केला तरी दृश्यविकास झाला नाही, असाही प्रसार झाला़ याचेच भांडवल करीत सेनेचे उपनेते आ़ तानाजी सावंत यांच्या गटाने ‘मातोश्री’वर फिल्डिंग लावली़ जवळपास आठ-दहा दिवस तेथेच तळ ठोकून या गटाने गायकवाडांचा पत्ता कापत ओमराजेंची उमेदवारी आणली आहे़
लातुरात खासदारांचा पालकमंत्र्यांवर ठपकाभाजपा लातूर लोकसभेचा उमेदवार बदलणार ही चर्चा अखेर खरी ठरली. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारत अपेक्षेप्रमाणे सुधाकर शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शेवटपर्यंत आपणाला तिकीट मिळणार, असा विश्वास असणारे खा. गायकवाड यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. ते म्हणाले, माझ्या कामावर मी समाधानी आहे. सरळ राजकारण केले. पक्षात गटबाजी केली नाही. संसदीय कामकाजात सहभाग नोंदविला. अडीच लाखांच्या फरकाने निवडून आलो होतो. शिवाय, माझ्यासारखे काम खुल्या जागेवर करणारा खासदार असता तर त्याचे तिकीट कापले गेले नसते, असे शल्य व्यक्त करीत खा. गायकवाड म्हणाले, स्थानिक नेतृत्वाने विरोध केला. माध्यमे उघडपणे पालकमंत्र्यांचे नाव घेत आहेत. त्यामुळे मला तिकीट मिळाले नाही, यामागे पक्षश्रेष्ठी नसून स्थानिकांचा हातभार आहे. कोणाला कशी उमेदवारी मिळाली, हे सर्वज्ञात आहे.
दरम्यान, उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, उमेदवारीचा निर्णय पक्षाने घेतला. तो सर्वांना मान्य आहे. खा.डॉ. हे माझे मित्र आहेत. त्यांच्याशी कसलेही मतभेद नाहीत. यापुढेही ते पक्षाचे काम आणि प्रचार करतील, असेही ते म्हणाले.