औरंगाबाद : निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देऊन लोकप्रतिनिधी जनतेची मते मिळवितात; पण नंतर सोयीप्रमाणे ही आश्वासने विसरून जातात. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण? असा परखड सवाल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधला आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
समस्या सोडविणारा नेता मिळावानिवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरली आहे. त्यामुळे जनतेने निवडणुकांकडे शांतचित्ताने बघूनच मत नोंदवावे. या निवडणुका गल्लीतल्या नाही दिल्लीतल्या आहेत; पण गल्लीतले प्रश्न सोडविण्यासाठी पैसा मात्र दिल्लीतूनच येणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेतला, तर काय मिळाले आणि या पाच वर्षांत सरकार काय देत आहे, याचा विचार करूनच मतदारांनी मतपेटी बोलकी करावी. इथल्या समस्या सोडविणारा नेता शहराला मिळावा. - शशिकांत वझे
कामाचे योग्य नियोजन हवे लोकप्रतिनिधींकडून खूप अपेक्षा आहेत; पण त्यांची पूर्तता कोण करणार, असा प्रश्न पडला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या तीच आहे. कचरा, पाणी यांच्याही समस्या वाढल्या आहेत. स्मार्टसिटी म्हणून नुसतीच घोषणा केली. येथे कोणत्याही गोष्टीचे नियोजनच नाही. लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. फक्त आपापल्या वॉर्डापुरता विचार होतो आणि ते वॉर्डातले कामही फार उल्लेखनीय नसते. - मीना पांडे
अपेक्षांची पूर्तता करणारा नेतानिवडणुकीपूर्वी लोकांनी मत द्यावे म्हणून हे लोकप्रतिनिधी घरोघरी फिरतात. अनेक आश्वासने देतात; पण नंतर मात्र दिलेली आश्वासने पूर्णपणे विसरून जातात. सामान्य जनतेच्या कोणत्याच अपेक्षांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासने लक्षात ठेवून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणारा लोकप्रतिनिधी शहराला पाहिजे आहे - सुनंदा खाडिलकर
कार्यान्वित करणारा नेता हवानिवडणुकांपूर्वी बैठक घेऊन लोकप्रतिनिधींनी काय केले, काय नाही केले आणि जे नाही केले ते करायला का जमले नाही, याविषयी नागरिक ांना माहिती द्यावी. स्मार्टसिटीची घोषणा केली, पण स्मार्टसिटीसाठी आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आणि कचरा या पाच मूलभूत सुविधांकडे स्वार्थामुळे किंवा अन्य कारणांमुळे लोकनेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांना कार्यान्वित करून शहराचा विकास करणारा नेता पाहिजे.- गुणवंत बंडाळे
मतदारांचा विरसजनतेला योग्य उमेदवार निवडून द्यावा वाटतो; पण तेच ते ठराविक चेहरे वारंवार निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे मतदारांचा विरस होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, असेच लोक आता निवडणुकांसाठी उभे राहतात. कमी पैसे असलेल्या चांगल्या माणसांना आता निवडणूक लढविण्याची संधी मिळत नाही. पूर्वी असे नव्हते, त्यामुळे ‘नोटा’चा वापर करावा का, या संभ्रमात अनेक मतदार आहेत.- संतुकराव जोशी
ज्येष्ठांसाठी असावे उद्यानआज रस्ते, पाणी, या समस्या प्रत्येक वार्डात आहेत. या समस्यांची सोडवणूक लोकप्रतिनिधींकडून होणे अपेक्षित आहे; पण त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीही शहरात काही सुविधा होणे गरजेचे आहे. मुलांना खेळण्यासाठी बागबगीचे असतात. त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी प्रत्येक वार्डात उद्यान असावे, शहरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे, असे वाटते. -सुभाष उबाळे