छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकीचे पघडम वाजू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांसोबतच इच्छुकांकडूनही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी शुक्रवारी येथे सत्कार समारंभात औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली. विनोद पाटील यांच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू झाली.
उत्तरप्रदेशातील आग्रा येथील किल्ल्यात जेथे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने दगाफटका करून अपमानित केले होते. त्याच दिवाण -ए -आम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समारंभाचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी विनोद पाटील यांनी केले होते. या यशस्वी आयोजनाबद्दल शहरातील नागरीकांच्यावतीने शुक्रवारी सिडकोतील मंगल कार्यालयात पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पहार घालून आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या समारंभात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यात अग्रसेर असलेली मंडळी विचारपीठावर उपस्थित होती. यावेळी प्रत्येकांनी आपल्या भाषणात विनोद पाटील यांनी आगामी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. यात प्रा.रामदास गायकवाड, प्रा. चंद्रकांत भराट, संदीप बोरसे, सुरेश वाकडे, माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद जंजाळ, रेखा वाहटुळे ,माजी उपमहापौर राजू शिंदे, विजय वाहुळ, महेश गुजरे, सतीश तुपे, कलीम शेख आदींनी उत्तर देताना विनोद पाटील यांनी सक्रिय राजकारणात यावे आणि आगामी लोकसभेची निवडणू लढवावी,अशी मागणी केली.
यावेळी प्रत्येक वक्ता सभागृहातील उपस्थितांना विनोद पाटील यांना आपल्याला खासदार करायचे असल्याचे आवाहन करीत. सभागृहातील मंडळीही त्यांना होकार देत. या सत्काराला उत्तर देताना विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. पाटील यांच्या घोषणेने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चित्र निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.
महाविकास आघाडीकडून खैरे ? तर महायुतीकडून डॉ. कराड यांची चर्चामहाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या नावाची तर एमआयएमकडून विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील हे निवडूणक रिंगणार असतील असे चित्र आहे. आता विनेाद पाटील यांच्या उमेदवारीने आगामी लोकसभा निवडणूक चौरंगी होईल होण्याची शक्यता आहे.