लोकमत इम्पॅक्ट: औरंगाबाद ‘घाटी’ रुग्णालयात दोन दिवसांत ऑक्सिजन निर्मिती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 03:48 PM2021-07-16T15:48:18+5:302021-07-16T15:50:02+5:30
पीएम केअर फंडातील प्रकल्प होता रेंगाळला
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाची जादू घाटी रुग्णालयात पाहायला मिळाली. दोन महिन्यांपासून रेंगाळलेला पीएम केअर फंडातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अवघ्या दोन दिवसांत कार्यान्वित झाला आणि ऑक्सिजन निर्मितीही सुरू झाली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. घाटी रुग्णालयात १४ मे रोजी पीएम केअर फंडातून मंजूर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. या प्लांटद्वारे ऑक्सिजन घाटीला पुढील १५ दिवसांत उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम रेंगाळले.
याविषयी ‘लोकमत’ने १२ जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या घाटी प्रशासनाने युद्धपातळीवर या प्रकल्पाचे रेंगाळलेले काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काम पूर्ण झाले आणि बुधवारपासून या प्रकल्पात ऑक्सिजन निर्मितीही सुरू झाली. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.