चक्क भंगार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र
By Admin | Published: July 18, 2016 12:40 AM2016-07-18T00:40:30+5:302016-07-18T01:11:14+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद आरटीओ कार्यालय विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद आरटीओ कार्यालय विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहत आहे. बोगस फिटनेस प्रमाणपत्र देणे आणि कोट्यवधींच्या करबुडवेगिरी प्रकरणानंतर आता चक्क भंगार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्याचा प्रताप उघड झाला आहे. याविषयी काहींनी थेट परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे चार मोटार वाहन निरीक्षकांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आरटीओ कार्यालयातर्फे अवजड वाहनांची पासिंग, फिटनेसचे कामकाज शेंद्रा एमआयडीसी येथे केले जाते. डिसेंबर २०१५ मध्ये एका मोटार वाहन निरीक्षकांनी फिटनेस प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी नसतानाही तब्बल ७०० वाहनांचे बोगस फिटनेस दिल्याचे कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. संबंधित निरीक्षकांवर फेब्रुवारीमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरटीओ कार्यालयात ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रुपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये २०११-१३ या कालावधीत ६०० पेक्षा अधिक वाहनांनी अशा प्रकारे कर बुडविल्याचे समोर आले. याप्रकरणी तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. सध्या डोळे झाकून फिटनेस प्रमाणपत्र वाटप केले जात असल्याचे दिसते. भंगार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे.