Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:16 PM2018-05-30T17:16:23+5:302018-05-30T17:20:11+5:30
औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ आहे
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा (१२ वी) निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर झाला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ असल्याची माहिती विभागीय मंडळाच्या अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद विभागात सामाविष्ठ असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात परभणी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. परभणी जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.९० टक्के एवढा लागला. तर औरंगाबादचा ८९.१४ टक्के, बीडचा ८९.०८ टक्के, जालना ८७.४५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८६.४० टक्के एवढा लागला आहे. या पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.
गुणपत्रिकांचे वाटप १२ जून रोजी
कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखाचे वाटप विभागीय मंडळामार्फत मंगळवारी (दि.१२ जून) होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित महाविद्यालायात याच दिवशी दुपारी ३ वाजता होणार असल्याचे सुगता पुन्ने यांनी स्पष्ट केले. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आकडेवारी
- औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यात ११८१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३७४ केंद्रावर परीक्षा झाली.
- परीक्षेसाठी ६१ परिरक्षक, ३७४ केंद्र संचालक, ६६०० पर्यवेक्षक, ३० मुख्य नियामक, ८९७ नियामक, ५९९१ परीरक्षक कार्यरत होते.
- परीक्षेसाठी एकुण १४३ विषय.
-परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ३०१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले
जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा नोंदणी हजेरी उत्तीर्ण टक्केवारी
परभणी २२,६६४ २२,५८७ २०३०६ ८९.९०
औरंगाबाद ५९,७०१ ५९,६०९ ५३,१४१ ८९.१५
बीड ३७,६६२ ३७,५५६ ३३,४५५ ८९.०८
जालना २७,२३४ २७,१८२ २३,७७२ ८७.४५
हिंगोली १२,१९१ १२,१५२ १०,४९९ ८६.४०
-------------------------------------------------------------------
एकुण १,५९,४५२ १,५९,०८६ १,४१,१७३ ८८.७४