Maharashtra Rains: राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढताना दिसत असून औरंगाबादच्या कन्नड घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कन्नड घाटात दरड कोसळल्यानं मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच वाहतूक ठप्प आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रशासन घटनास्थळावर पोहोण्याचा प्रयत्न करत आहे. दरड दुर्घटनेत अद्याप जीवीतहानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Rain Live Updates : कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली; औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प
औरंगाबादमधला पाझर तलाव फुटला आहे. तर जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक दुकानं आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. ढगफुटी सदृश्य पावसामुळे कन्नड तालुक्यातील जवळपास १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे.
भारतीय हवामान विभागानं राज्यात ३० ऑगस्टपासून तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. यात काही ठिकणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात पालघर, रायगड, ठाणे, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तर पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि बीड परिसरात पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.