एपीएल-१० चा महासंग्राम आजपासून; उद्घाटन सोहळ्यात लेझर शो ठरणार प्रमुख आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:23 PM2023-01-30T15:23:06+5:302023-01-30T15:24:04+5:30
विजेतेपदासाठी १० संघात रंगणार झुंज : चाहत्यांसाठी ८ दिवसांत २३ रोमहर्षक सामन्यांची पर्वणी
औरंगाबाद : तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा मराठवाड्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या लोकमतऔरंगाबाद प्रीमिअर लीगचा १० चा महासंग्राम उद्या, साेमवारपासून गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात लेझर शो हा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या लेझर शोमुळे विविध रंगांच्या किरणे व छटांनी आकाश आणि औरंगाबाद शहर उजळून निघणार आहे.
बाकलीवाल अँड सन्स प्रस्तुत या एपीएलच्या महासंग्रामात विजेतेपदासाठी १० संघातील खेळाडू सर्वस्व पणाला लावणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना या महासंग्रामात ८ दिवसांत तब्बल २३ रोमहर्षक सामन्यांची पर्वणी मिळणार आहे. क्रिकेट रसिक आणि खेळाडूंच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेत नवव्या पर्वातील चॅम्पियन ठरणारा मिहिर मुळे यांचा ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड (उस्मानपुरा), करण राजपाल यांचा मनजित प्राईड वर्ल्ड (प्रतापनगर), श्याम अग्रवाल यांचा शक्ती स्ट्रायकर्स (आकाशवाणी), कैलास जैन यांचा जेन्युएन रॉयल्स (बाबा पेट्रोलपंप), राजेश शिंदे यांचा शिंदे रायझिंग किंग्ज (क्रांती चौक), संदीप नागरे यांचा भवानी टायगर्स (सिडको), असिफ पटेल यांचा पटेल किंग वॉरियर्स (पीरबाजार), के. एस. राव यांचा रॉय रॉयल्स (सेव्हन हिल्स), हर्षवर्धन कराड यांचा कराड हॉक्स (कोटला कॉलनी), गुड्डू वाहूळ यांचा गुड्डू ईएमआय २१ (हडको) हे दहा संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत.
सोमवारी या स्पर्धेतील सलामीचा सामना दुपारी ३ वाजता के. एस. राव यांचा राव रॉयल्स (सेव्हन हिल्स) आणि गुड्डू वाहूळ यांचा ईएमआय २१ (हडको) या दोन संघात रंगणार आहे. या सामन्यानंतर खेळाडू, स्पॉन्सर्स आणि उपस्थित हजारो क्रिकेट रसिकांच्या साक्षीने सायंकाळी ५.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा लेझर शो होणार आहे. या लेझर शोमुळे विविध रंगांच्या छटांनी आकाश उजळून निघणार आहे. त्यानंतर रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी करण राजपाल यांचा मनजीत प्राइड वर्ल्ड (प्रतापनगर) आणि गतविजेता मिहिर मुळे यांचा ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड (उस्मानपुरा) यांच्यात चुरशीची झुंज रंगणार आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेट रसिकांना धावांचा पाऊस, चौकार, षटकारांची आतषबाजी पाहण्याची सुवर्णसंधी मिळावी यासाठी एपीएल १० चे टायटल स्पॉन्सर्स, स्पॉन्सर, सहप्रायोजक आणि सहभागी १० संघांच्या मालकांनी ही स्पर्धा संस्मरणीय ठरवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.