उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले
By बापू सोळुंके | Published: April 10, 2024 04:44 PM2024-04-10T16:44:42+5:302024-04-10T16:45:01+5:30
जागेचा गुंता न सुटल्याने शिंदेसेना आणि भाजपमधील इच्छुकांना पंचांगातील या शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडता आला नाही.
छत्रपती संभाजीनगर : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटेल, असा दावा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला. जागेचा गुंता न सुटल्याने शिंदेसेना आणि भाजपमधील इच्छुकांना पंचांगातील या शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडता आला नाही.
औरंगाबादवगळता मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत जालन्याची जागा काँग्रेसकडे गेल्याने तेथे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना होणार आहे. दुसरीकडे महायुतीत औरंगाबादच्या जागेचा वाद मिटलेला नाही. एकीकडे, ही जागा आम्हीच लढविणार असल्याचा दावा शिंदेसेनेकडून केला जात असला तरी विविध प्रकारच्या सर्व्हेचा आधार घेत भाजपकडून दबाव वाढविला जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागेचा तिढा सुटेल आणि आम्ही प्रचाराचा नारळ फोडून विजयाची गुढी उभारू, असा दावा शिंदेसेनेच्या नेत्यांनी केला होता. मात्र, तोही मुहूर्त टळल्याने महायुतीत अस्वस्थता आहे.
मंगळवारी एका कार्यक्रमात महायुतीचे नेते एकत्र जमले होते. तिथेही हीच चर्चा होती. जागा कोणाला सुटली तरी आम्ही एकत्रितपणे लढू, असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जात असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नाही. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील महायुतीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडिमार करुन त्यांना भंडावून सोडल्याचे दिसले.