औरंगाबाद - विधानपरिषदेच्याऔरंगाबाद-जालना मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीच विजयाचा गुलाल उधळला. दानवेंना एकूण 524 मते मिळाली असून 418 मते अधिक घेत त्यांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांना 106 च मते मिळाली आहेत.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची 207 मते फुटली. तर 14 मते बाद झाली. भवानीदास कुलकर्णी यांना 106 मते मिळाली. पहिल्याच फेरीतच आघाडी गारद झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अपक्ष शाहनवाज खान यांना केवळ 3 मते मिळाली. विशेष म्हणजे एमआयएमनेही अनपेक्षितरीत्या महायुतीच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे दानवे यांचा विजय सहज आणि सोपा झाला होता.
पक्ष योग्य वेळ पाहून संधी देत असतो, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मला संधी दिली. त्यामुळे मी आमदार झाल्याचे अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. गुप्त मतदान हेच विक्रमी मतांचं गणित असून शिवसेना आणि भाजपाचे मिळून 292 मतदान होतं. मात्र, काँग्रेसचेही काही अदृश्य मतं मिळाली, असेही दानवेंनी विजयानंतर बोलताना सांगितलं.