‘मैं नहीं तो कौन बे...’ रॅपचे चाहते म्हणताय हे तर कॉन्फिडन्स बुस्टर; रील्सनंतर आली टॅटूची क्रेझ
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 5, 2022 01:45 PM2022-11-05T13:45:38+5:302022-11-05T13:46:53+5:30
हे रॅप अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरल्याने शौकीन आबालवृद्ध हातावर ‘ मैं नहीं तो कौन बे...’ हा टॅटूही काढत आहेत.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : ‘मैं नहीं तो कौन बे..., ये ये मैं नहीं तो कोन बे... मैं नहीं तो कौन’ या रॅपने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या एकाच गाण्याने सृष्टी तायडे रात्रीतून ‘रॅप स्टार’ झाली आहे. औरंगाबादेतील अनेक युवक-युवतींनी या रॅपवर सोशल मीडियामध्ये ‘रिल’ बनवले असून, तेही तुफान व्हायरल होत आहे. हे रॅप अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरल्याने शौकीन आबालवृद्ध हातावर ‘ मैं नहीं तो कौन बे...’ हा टॅटूही काढत आहेत. सृष्टी तायडे या मराठी तरुणीने स्वत: लिहून ‘मैं नहीं तो कौन बे...’ हे रॅप गात आपल्या आवाजाची जादू रॅपप्रेमींवर केली आहे. हे रॅप जंगलात वणवा पसरावा, त्या गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या रॅपची क्रेझ औरंगाबादेतही पाहण्यास मिळते आहे.
हे रॅप एवढे लोकप्रिय झाले की, त्याची टाइमलाइन (मुखडा) हातावर गोंदून घेतला जात आहे. औरंगाबादेत रॅपप्रेमी २० वर्षांच्या युवक-युवतीपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक टॅटू काढून घेत आहेत. यामुळे टॅटू आर्टिस्टला ‘डिमांड’ आली आहे. दररोज नवीन तीन ते चारजण रॅपचे टाइमलाइन हातावर काढून घेत असल्याची माहिती टॅटू आर्टिस्ट सीमा कस्तुरे यांनी दिली.
साक्षी हिवराळे ठरली सुपरहिट
औरंगाबादची लेक व महाराष्ट्राची कराटे चॅम्पियन साक्षी हिवराळे हिने सृष्टी तायडे हिने गायलेल्या ‘मैं नहीं तो कौन बे’ या रॅपची रिल तयार केली. ही रिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ७३ हजार व्ह्यूज तिला मिळाले. रिल तयार करणारी औरंगाबादेतील साक्षी ही एकटी नसून अनेक तरुणी व तरुणांचे रिल व्हायरल होत आहेत व त्यांनाही मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.
आत्मविश्वास वाढला
‘मै नहीं तो कौन बे’ हे रॅप मला खूप आवडले... या पहिल्या टाइमलाइनने माझ्यातील आत्मविश्वास वाढविला... एखादे वाक्य तुमचे आयुष्य घडवू शकते. माझ्या बाबतीतच नव्हे तर अनेक जण असतील त्यांना या रॅपने आत्मबळ, आत्मविश्वास निर्माण करून दिला असेल. यामुळे टाइमलाइनचे टॅटू माझ्या हातावर काढले.
- पुनम चोपडा, रॅप, टॅटू प्रेमी