- पुरुषोत्तम करवामाजलगाव (जि. बीड) : तालुक्यात मागील २-३ वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून ( Silk Farming )मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत. याची माहिती सोशल मीडियाद्वारे ( Social Media ) नेपाळमधील ( Nepal ) शेतकऱ्यांना मिळाल्याने त्यांनी येथील शेतकऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधतमैत्री केली. ती एवढी घट्ट झाली की,नेपाळच्या शेतकऱ्यांनी टालेवाडी येथे भेट दिली. येथील शेतकऱ्यांच्या शेतात तब्बल चार दिवस मुक्काम करत रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्नाबाबत सविस्तर माहिती घेतली. मराठवाडी पाहुणचाराने नेपाळचे शेतकरी भारावून गेले. ( Majalgaon's silk farming attracts Nepalese farmers; Overwhelmed by Marathwadi hospitality)
माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील शेतकरी शिवराज फाटे हे अनेक वर्षांपासून रेशीम शेती करत चांगले उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले. इतर शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत मोफत माहिती देत ते फिरत असतात. त्यामुळे त्यांची शेती त्यांची पत्नी छाया व मुलगा वेदांत पाहतात. त्यांची रेशीम शेती पाहण्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरून शेतकरी येत असतात. या कुटुंबीयांची रेशीम शेती पाहण्यासाठी नेपाळ येथील महेश अधिकारी व त्यांची पत्नी सुनिता अधिकारी रविवारी आले होते. येथील शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान, कार्यपद्धती पाहून त्यांनी या ठिकाणी चार दिवस मुक्काम करत रेशीम शेती पाहिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याकडे उत्पन्न निघत नाही, कोषासारखे कोष तयार होत नाहीत व ते वजनदार नसल्याने उत्पन्न कमी होत असल्याचे रेशीम शेतीबाबत नेपाळच्या शेतकऱ्यांनी सांगितले.
विविध ठिकाणी केली पाहणीशिवराज फाटे यांची रेशीम शेती पाहून ते आनंदित झाले. याठिकाणी देशी मोर पडणारी रोगराई व हे पीक वाढविण्यासाठीचे उपाय, पर्यायांबाबत तर नित्रुड येथील शेतकरी सचिन लगड यांच्याकडे चॉकी व मकरध्वज बडे यांच्याकडे रेशीमच्या अळीबाबत माहिती घेतली. आडस येथील शेतकरी साजिद पठाण यांच्याकडे रेशीम धागानिर्मितीची पाहणी केली. तालेवाडी येथील दादासाहेब जगताप यांच्या शेतातही पाहणी केली.
रक्षाबंधन पाहून भारावलेनेपाळ येथील शेतकरी जोडपे टालेवाडी येथे रक्षाबंधनाच्या दिवशी आले होते. येथील रक्षाबंधन कार्यक्रम व सणसंस्कृती पाहून ते अतिशय भारावले. यावेळी त्यांना पुरणपोळी खूप आवडली. पुरणपोळी कशी बनवायची याची माहिती लिहून घेतली. त्यानंतर इतर दिवशी महाराष्ट्रीयन जेवणाचा स्वाद घेतला.
उत्पन्नवाढीसाठी निश्चित फायदाआम्ही अनेक वर्षांपासून रेशीमची लागवड करतो. याद्वारे रेशीमचे कपडे तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. आमच्याकडे तयार झालेली पहिली साडी येथील राष्ट्रपतींनी त्यांच्या पत्नीसाठी नेली होती. महाराष्ट्रात आमच्यापेक्षा जास्त उत्पन्न शेतकरी कसे घेतात याची आम्ही माहिती घेतली असून याचा उत्पन्नवाढीसाठी आम्हाला निश्चित फायदा होईल.- महेश अधिकारी, नेपाळचे शेतकरी.
लागवड ते विक्री सर्व माहिती दिली आम्ही अनेक गावांतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी नेपाळ येथील शेतकऱ्यांना रेशीम लागवडीपासून ते कापड विक्री करण्यापर्यंतची माहिती दिली. यामुळे ते आनंदीत झाले.-शिवराज फाटे ,रेशीम उत्पादक शेतकरी