तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा आरोग्य उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून, काटेरी झाडाने इमारतीला वेढा घातला आहे. तसेच शौचालयाचीही पडझड झाली आहे. भूमिगत सिमेंट टँक फुटल्याने दुर्गंधीचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. येथे कर्मचारी निवासी नसल्याने हे उपकेंद्र सतत कुलूपबंद असते. सांगवी (काटी), माळुंब्रा, कदमवाडी, पांगरधरवाडी या चार गावच्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी माळुंब्रा येथे आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य उपकेंद्र चालविले जाते. इमारती भोवताली सुरक्षा भिंत नसल्याने कुत्रे, मोकाट जनावरांचा वावर दवाखान्यासमोरील मैदानात नेहमी असतो. लोखंडी गेट बसविले होते तेही गायब झाले आहे. पावसाळ्यात इमारतीला गळती लागली आहे. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या मागील बाजूस असलेला शौचालयाचा टँक फुटला असून, त्यातील मैला बाहेर येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. प्रसुतीगृह नव्याने बांधण्यात आले. त्यासही गळती लागली आहे. त्यामुळे हे उपकेंद्राच्या बाबतीत रूग्णांना असून अडचण, नसून खोळंबा या म्हणीचा प्रत्येय येत आहे. उपकेंद्रासाठी एक आरोग्य सेविका, २ आरोग्य सेवक असे तीन कर्मचारी नियुक्त आहेत. मात्र येथे एकही कर्मचारी राहत नाही. त्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र सतत कुलूपबंद असते, असे गावकऱ्यांनी सांगितले. याचा फटका परिसरातील रूग्णांना बसत आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतचा ठरावआरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची झालेली दुरवस्था, समोेर पसरलेली घाण व नव्याने सुरक्षा भिंत बांधणीसाठी आरोग्य विभागाने निधी मंजूर करावा, असा ठराव माळुंब्रा ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत दोनवेळा घेतला. त्याची प्रत जि.प. कडे पाठविली. परंतु अद्याप त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत सरपंच मंजुषा नानासाहेब गाटे, उपसरपंच झुंबर बडवे यांनी व्यक्त केली.
माळुंब्रा उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत
By admin | Published: July 30, 2014 12:30 AM