माळेगाव-पिंप्री पाझर तलाव गूढ आवाजाने हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:05 PM2020-12-05T19:05:53+5:302020-12-05T19:08:00+5:30
अचानक पाण्यात मोठ्या लाटा उसळल्याने नागरिकांमध्ये घबराट
सोयगाव : तालुक्यातील माळेगाव-पिंपरी पाझर तलावात शनिवारी पहाटे चार वाजता आणि सकाळी ११ वाजता तब्बल चारवेळा गूढ आवाज आला. या आवाजाने तलाव परिसर हादरला असून संरक्षण भिंतीना तडे गेले आहेत. यामुळे तलावातील पाणी गळती वाढली आहे. तलावातील पाणी शेतात गेल्याने रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. आवाजाचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोयगाव तालुक्यात माळेगाव-पिंपरी शिवारात जिल्हा परिषद सिंचन विभागाचा पाझर तलाव आहे. शनिवारी पहाटे चार वाजता अचानक पाझर तलावात मोठा आवाज झाला. यामुळे तलावाच्या बाजूलाच शेतावर झोपलेल्या श्रीराम वाघ हे आवाजाने खडबडून जागे झाले. त्यानंतर पुन्हा सकाळी अकरा वाजता दोन आवाज ऐकायला आले. यावेळी पाझर तलावात पाण्याच्या लाटा उसळल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. या हादऱ्यांमुळे तलावाच्या संरक्षण भिंतीला मोठे तडे गेले आहे. यातून पाण्याची गळती सुरु झाली. यामुळे तासभरात पाझर तलावाच्या खाली असलेल्या दहा हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली असून शासनाने आवाज कशाचा आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
तलावाकडे ग्रामस्थांची धाव
या गूढ आवाजाचा हादरा फक्त तलाव परिसरात जाणवला आहे. यामुळे हा प्रकार भूकंपाचा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणे आहे. सरपंच दादाभाऊ जाधव, श्रीराम वाघ, सुभाष वाघ, शांताराम वाघ, देविदास पाटील, अंकुश मुत्ठे, विजय परदेशी, संदीप राजपूत, भगवान वाघ आदी शेतकऱ्यांनी तलावाची पाहणी केली.