औरंगाबाद : समर्थनगरमधील बँक कर्मचारी महिलेचे बंद घर फोडून अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख रुपये आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या मामा-भाच्याच्या टोळीनेच पळविल्याचे समोर आले. या टोळीच्या म्होरक्यासह साथीदाराला ९ फेब्रुवारी रोजी बीड बायपासवर सापळा रचून आणि पाठलाग करून गुन्हे शाखेने पकडले. या टोळीतील दोन जणांना चार दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमधून पकडून आणले होते.
मुख्य आरोपी किशोर तेजराव वायाळ आणि राजू शिवाजी इंगळे (२४, रा. बाराई, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे शनिवारी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी बँक कर्मचारी सुनीता धर्मेंद्र पुराणिक यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ४ फेब्रुवारी रोजी अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख रुपये चोरून नेले होते. भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या टोळीतील दोन संशयित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी तपास केला असता ही घरफोडी आंतरराज्यीय घरफोड्या करणाऱ्या किशोर वायाळच्या टोळीने केल्याचे समोर आले.
या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह पंधरा कर्मचाऱ्यांची तीन पथके या टोळीचा शोध घेत होती. दोन पथके बुलडाणा जिल्ह्यात तर अन्य एक पथक नगर जिल्ह्यात होते. बुलडाणा जिल्ह्यातील पथकाने ८ फेब्रुवारी रोजी किरण सोपान चव्हाण (१९) आणि कर्मा प्रकाश पवार (२०) यांना पकडले होते. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन कुख्यात आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या टोळीचा प्रमुख किशोर वायाळ याचे नाव सांगितले होते. मात्र तो सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पुन्हा तीन पथके तैनात केली होती. दरम्यान वायाळ आणि इंगळे साथीदारांसह शिर्डी येथून बुलडाण्याला दुचाकीने बायपास मार्गे जाणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली.
आरोपी अत्यंत चाणाक्ष असून, सीसीटीव्हीत अडकले जाऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन चोरी करून पळून जाताच रस्त्यातच आपला पेहराव बदलत. शिवाय चोरी करण्यासाठी ते सर्वजण दुचाकीने एका शहरातून दुसऱ्या शहरात जात. दरम्यान, या टोळीने विदर्भातील विविध जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील जालना, बीड, औरंगाबादेत, अहमदनगर जिल्ह्यात घरफोड्या केल्या आहेत.
सापळा रचला अन् अडकले...वायाळ आणि इंगळेला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक विजय जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बायपासवर सापळा रचला. तेव्हा पटेल लॉन्सजवळ दोन वेगवेगळ्या दुचाकीने संशयित येताना दिसले. जारवाल यांनी झडप घालून वायाळला पकडले. तेव्हा इंगळे सुसाट पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून इंगळेला पकडले.
समर्थनगरात घरफोडी केल्यानंतर शिर्डी येथे ठोकला मुक्कामवायाळ हा टोळीचा प्रमुख असून, त्याला सर्वजण मामा नावाने हाक मारत, तर तो साथीदारांना भाचे म्हणत असे. या मामा-भाच्याच्या टोळीने समर्थनगरात अवघ्या पाच ते सात मिनिटांत पुराणिक यांचे घर फोडून सुमारे १६ लाखांचा ऐवज पळविला. त्यानंतर ते दुचाक ीने लगेच शिर्डी येथे मुक्कामी गेले. चोरलेला माल टोळीतील काही जणांकडे सोपवून त्यांना गावाकडे रवाना केले होते. शिर्डी येथे चार दिवस मुक्कामी असताना त्यांनी परिसरातील लोणी, प्रवरासंगम, श्रीरामपूर आदी शहरांतही घरफोड्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.