औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी आणि गंभीर पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ढोल वाजवत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. उपायुक्तांच्या दालनात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करीत शिष्टमंडळाने प्रशासनाकडून लिहून घेतले की, पंधरा दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. शहरातील प्रत्येक वसाहतीला तीन दिवसाआड पाणी देण्यात येईल.सकाळी ११ वाजताच मनसे कार्यकर्ते महापालिकेसमोर दाखल झाले. त्यांनी ढोल वाजविणे सुरू केले. शहरात १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाण्याचा साठा होतो. काही भागांत पाचव्या व सहाव्या दिवशी पाणी का दिले जाते, असा सवाल त्यांनी केला. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर यापुढे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख विक्रम मांडुरके यांनी येत्या १५ दिवसांत कचऱ्याची समस्या सोडवू, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, आशिष सुरडकर, अब्दुल रशीद, गजन गौडा, संतोष पवार, संकेत शेटे, अशोक पवार, भारत गायकवाड, राजेश पुरी, उमेश दीक्षित, सुरेंद्र वाडेकर, वंदना गाढे, अनिता लोमटे, लीला राजपूत, सपना ढगे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
औरंगाबादेत कचरा, पाणी प्रश्नावर मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:53 AM