औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींना मागील पाच ते आठ दिवसांपासून एक थेंबभरही पाणी देण्यात आलेले नाही. उलट पाणी दिल्याचा अजब दावा महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी दिवसभर करताना दिसून आले. नागरिक आक्रमक होताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बॅकफुटवर आले. आज पाणी आले नसले तरी उद्या येईल, टँकरने पाणी देण्यात येईल, असे सांगून निव्वळ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येत असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. हा दावा अत्यंत फोल असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी जायकवाडी, फारोळा येथे केबल जळाल्याने काही वेळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा गुरुवारी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला. शहरातील काही वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाने कळविले होते.
प्रत्यक्षात मनपाने एक दिवसाची घोषणा करून पाणीपुरवठा तीन ते चार दिवस पुढे ढकलला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांआड नाही तर चौथ्या, पाच दिवशी नागरिकांना पाणी अपेक्षित होते. पाच दिवसांनंतरही अनेक वसाहतींना एक थेंबही पाणी देण्यात आले नाही. उलट संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर आदी अनेक वसाहतींना मागील आठ दिवसांपासून पाणी नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मनपाने पाणी दिल्याचा चक्क खोटा दावा केला. रात्री उशिरापर्यंतही पाणी न आल्याने कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारणा केली. उद्या टँकरने पाणी देण्याचे आश्वासन दिले
कोणत्या वसाहतींना पाणी कधीपुंडलिकनगर : ५ दिवसांनंतरही पाणी नाहीनंदनवन कॉलनी : ८ दिवसांनंतरही पाणी नाहीशिवाजीनगर : ५ व्या दिवशी पाणी मिळालेगजानननगर : ४ दिवसांनंतर पाणी आलेशास्त्रीनगर : ६ दिवसांपासून पाणीच नाहीखिंवसरा पार्क : ४ दिवसांनंतर पाणी आले