औरंगाबादमध्ये आरटीई प्रवेशाच्या सोडतीकडे अनेक पालकांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:56 PM2018-03-14T19:56:15+5:302018-03-14T19:56:41+5:30
शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली.
औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली. प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या अर्ज क्रमांकानुसार सोडत पद्धतीने (लॉटरी सिस्टिम) निघालेले क्रमांक ‘एनआयसी’कडे पाठविण्यात आले. तथापि, मंगळवारच्या या पहिल्याच फेरीला मात्र अनेक पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सभागृहात दिसून आले.
यंदा शिक्षण विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील ५६५ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ३७१ जागा निश्चित करण्यात आल्या असून, रविवारी अखेरच्या मुदतीपर्यंत ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज केले असले तरी निवास ते शाळा हे एक कि.मी.च्या आत अंतर असणार्या विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीसाठी विचार करण्यात आला. सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित केलेल्या या प्रवेश फेरीला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, रमेश ठाकूर, श्रीकांत दीक्षित व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
आज सोडत पद्धतीने काढण्यात आलेले क्रमांक ‘एनआयसी’ कार्यालयास पाठविण्यात आले. ‘एनआयसी’कडून उद्या रात्रीपर्यंत पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाबद्दल माहिती कळविण्यात येणार आहे. सोडत पद्धतीने मिळालेल्या शाळेत पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणे गरजचे आहे. त्यामुळे ‘एसएमएस’ आल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार
आहे.
सर्वांसमक्ष काढले नंबर; पारदर्शक प्रक्रिया
संत तुकाराम नाट्यगृहात उपस्थित पालकांना राबविण्यात येणार्या लॉटरी सिस्टिमबद्दल अगोदर माहिती देण्यात आली. सर्वांसमक्ष काचेची चार भांडे ठेवण्यात आली. त्या चारही काचेच्या भांड्यांत ० ते ९ क्रमांकाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. पालकांसोबत आलेल्या बालकांच्या हाताने चारही भांड्यांतून प्रत्येकी एक अशा चार चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आॅनलाईन नोंदणी केलेल्या पालकांच्या अर्जांचा क्रमांक चारअंकी असल्यामुळे चार चिठ्ठ्या काढून चारअंकी क्रमांक जोडण्यात आला. अशा पद्धतीने क्रमांक काढून शिक्षण विभागाने पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवली. सदरील काढलेले क्रमांक तात्काळ ‘एनआयसी’ कार्यालयास कळविण्यात आले.