शिवसंग्राम-शिवसैनिकांत राडा, मेटेंना शिवीगाळ; मराठा आरक्षण बैठक शिवसैनिकांनी उधळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:53 AM2021-06-25T06:53:55+5:302021-06-25T06:54:17+5:30
औरंगाबादमधील घटना : मराठा आरक्षण बैठक शिवसैनिकांनी उधळली
औरंगाबाद : मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने गुरुवारी आयोजित बैठकीत शिवसैनिकांनी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ करून त्यांचे भाषण बंद पाडले. तसेच यावेळी बैठकीच्या संयोजकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान सरकारच्या गुंडांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आ. मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष उमाकांत माकणे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पडेगाव आणि मिटमिटा येथील
मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. आ. मेटे हे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. बैठकीत आ. मेटे बोलत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, राहुल यलची, सचिन घनवट यांच्यासह पाच ते सहा जण तेथे दाखल झाले.
या कार्यकर्त्यांनी आ. मेटे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मेटेंनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. यावेळी डॉ. अभिमन्यू उमाकांत माकणे यांनी त्यांना हॉलमधून बाहेर जाण्यास सांगताच त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. याविषयी डॉ. अभिमन्यू माकणे यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.