मराठवाडा विकास मंडळ सदस्यांच्या बैठकीला खो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:02 AM2018-04-04T01:02:23+5:302018-04-04T15:16:46+5:30
मराठवाडा विकास मंडळाची ४ एप्रिल रोजी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाची ४ एप्रिल रोजी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बैठकीसाठी मंडळावरील तज्ज्ञ सदस्यांनी सिंचन, भौगोलिक, शिक्षण, वैद्यकीय, रोजगार अनुशेषाबाबत तयार केलेल्या टिपणीसाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. चार वर्षांपासून विकास मंडळाला पूर्णवेळ अशासकीय अध्यक्ष देण्यात आलेले नाहीत. त्यातच अनुशेष व अनुदान मिळत नसल्यामुळे ते मंडळ कागदोपत्रीच सुरू आहे. त्याचा या विभागाला सध्या तरी काहीही उपयोग होत नसल्याचे दिसते आहे.
फेबु्रवारी महिन्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा विकास मंडळ सदस्यांना वेळ देऊनही बैठक घेतली नाही. त्यावेळी तयार केलेला १ हजार कोटी रुपयांचा मराठवाडा अनुशेषाचा प्रश्न शासनापर्यंत गेलाच नाही. त्यानंतर राज्यपालांनी ४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व मंडळांच्या अनुशेषावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन केले; परंतु ती बैठकही लांबणीवर पडल्यामुळे मराठवाड्याच्या अनुशेष दूर होण्यासाठी केव्हा मुहूर्त लागणार, असा प्रश्न आहे.
निधी कधी मिळणार?
राज्यातील तिन्ही मंडळांसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात असे. १९९५-९६ पासून २५ कोटी रुपये मराठवाडा विकास मंडळाला मिळत असत. २०११ पासून हा विशेष निधी बंद झाला. २०१४-१५ साली १४ कोटी थकीत निधीपैकी मिळाले. उर्वरित ८६ कोटी अजून दिलेले नाहीत. मंडळ २०१५ पासून या निधीसाठी पाठपुरावा करीत आहे. निधी देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशींचा विचार होत नसल्याचे मंडळाचे मत आहे.