मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प अद्याप रिकामेच

By Admin | Published: July 18, 2016 12:39 AM2016-07-18T00:39:53+5:302016-07-18T01:10:57+5:30

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्केइतकाच जलसाठा होऊ शकला आहे.

Marathwada irrigation project is still empty | मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प अद्याप रिकामेच

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प अद्याप रिकामेच

googlenewsNext

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्केइतकाच जलसाठा होऊ शकला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. या जिल्ह्यांमधील शेकडो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. अजूनही अनेक गावांमधील पाणीटंचाई दूर झालेली नाही. जूनअखेरीस मराठवाड्यातील सर्व धरणे कोरडी पडली होती. विभागातील पाणीसाठा अर्ध्या टक्क्यावर आला होता. जुलैच्या सुरुवातीला मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली; परंतु अजूनही विभागातील धरणे रिकामीच आहेत. १५ जुलैच्या अखेरीस मराठवाड्यातील धरणांमध्ये अवघा साडेचार टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे.
सध्या मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२१ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीसह आठ मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. केवळ तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम १६४ दलघमीचा साठा होऊ शकला आहे. यामध्ये निम्न दुधना, विष्णूपुरी आणि पेनगंगा धरणाचा समावेश आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थितीही अद्याप सुधारलेली नाही. मराठवाड्यातील ७५ मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत केवळ ५४ दलघमी (५.८३ टक्के) साठा आहे. त्याचप्रमाणे विभागातील ७३२ लघु प्रकल्पांमध्ये ११७ दलघमी म्हणजे केवळ ७.३५ टक्के साठा आहे. धरणांमध्ये पुरेसे पाणी न आल्यामुळे शेकडो गावांतील पाणीपुरवठा योजना अजूनही बंदच आहेत. विभागात सिंचन प्रकल्पांवर हजारो गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाण्याअभावी या सर्व पाणीपुरवठा योजना जानेवारी महिन्यापासूनच बंद झाल्या होत्या. त्यातील काही प्रकल्पांत पाणी आल्यामुळे त्या सुरू झाल्या आहेत. परंतु अजूनही सर्व गावांतील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Marathwada irrigation project is still empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.