औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्चच्या अखेरपर्यंत १८५ गावांत २५० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ३२५ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. जिल्हानिहाय टंचाई आराखड्याचे आदेश विभागीय पातळीवरून देण्यात आले आहेत. टंचाई आराखडा लवकरच अंतिम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
२५० टँकरचा आकडा या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३०० च्या आसपास जाण्याचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. यंदा शेती व इतर उपयोगासाठी जायकवाडीतून ८ आवर्तने देणे सध्या शक्य आहे. तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनाने केल्या आहेत. विभागातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात विभागातील सुमारे ३२ ते ४० तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते. टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला प्रशासकीय पातळीवरून सूचना दिल्या आहेत. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी २७ मध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी, २७ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, तर ५० ते ७५ पर्यंत २१ प्रकल्पांत पाणी आहे. विभागातील ७४३ लघु प्रकल्प आहेत. ४७३ प्रकल्पांत कमी साठा आहे. १९६ प्रकल्पांत बऱ्यापैकी पाणी आहे, तर ६६ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक पाणी आहे. ८ लघु प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे.
जायकवाडी वगळता इतरत्र पाणीसाठा कमीविभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यातील तीन प्रकल्प नांदेड, तर १ प्रकल्प परभणी जिल्ह्यातील आहे. २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा हिंगोलीतील एका प्रकल्पात आहे. उस्मानाबादमधील दोन आणि परभणीतील एका मोठ्या प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. बीडमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असून, औरंगाबादमध्ये जायकवाडीत ७५ टक्के पाणी आहे.