हिंगोली/ बहादरपूरा (जि. नांदेड)/ रेणापूर (जि. लातूर) : सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील एक घटना हिंगोली, दुसरी नांदेड तर तिसरी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली.
हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील भीमराव शिवाजी सोळंके (२५) या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना गुरूवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
दुसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील जांभूळवाडी (ता. कंधार) येथील बळीराम भीमराव मुसळे (५५) या शेतकऱ्याने नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना १८ जुलै रोजी घडली़ त्यांना उपचारासाठी कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात हालविण्यात आले़ परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी कंधार पोलीसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे.
तिसरी घटना लातूर जिल्ह्यातील कामखेडा (ता. रेणापूर) येथील हणमंत संतराम मेकले (४३) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज व नापिकीमुळे झाडाला गळफास घेतला. त्यांच्यावर सुमारे दहा लाखांचे कर्ज होते. अर्थिक संकटामुळे कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली.