औरंगाबाद : पुढील महिन्यात होणाºया विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी औरंगाबादचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण आणि फिरकी गोलंदाज सनी पंडित यांची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संभाव्य क्रिकेट संघाचे शिबीर पुणे येथे उद्यापासून सुरू होत आहे.या शिबिरात निवड झालेल्या स्वप्नील चव्हाण याने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे झालेल्या निमंत्रित सिनिअर संघांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान फलंदाज स्वप्नील चव्हाण याने सेक्रेटरी इलेव्हनचे प्रतिनिधित्व करताना ८८ च्या जबरदस्त धावसरासरीने चार सामन्यांत २६४ धावांचा पाऊस पाडला होता. त्यात त्याने पीवायसीविरुद्ध नाबाद १३५ आणि डीव्हीसीए संघाविरुद्ध ७७ धावांची अप्रतिम खेळी करताना सेक्रेटरी इलेव्हन संघाला शानदार विजय मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. रवाना होण्याआधी त्याने महाराष्ट्राच्या अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावणार असून, मला औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांचे वेळोवेळी प्रोत्साहन लाभत असल्याचे सांगितले. संभाव्य संघात निवड झालेल्या सन्नी पंडित याने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत ५ सामन्यांतच ४६ बळी घेत आपला विशेष ठसा उमटवला होता. तसेच टी-२० च्या ३ सिलेक्शन सामन्यांत ६ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे त्याने २०१६-२०१७ या हंगामात तब्बल ६० बळी घेतले होते.या दोघांच्या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, कोषाध्यक्ष सुभाष पटेल, विभागीय सचिव प्रदीप देशमुख, हिंगोली जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव श्यामाकांत देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.
मराठवाड्याचे स्वप्नील चव्हाण, सनी पंडित महाराष्ट्राच्या संभाव्य वनडे संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:48 AM