किलेअर्क, मोंढा, नारेगावातील अतिक्रमणांवर मार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:55+5:302021-05-05T04:06:55+5:30
औरंगाबाद : रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या, ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणास अडथळा निर्माण करणार्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने ...
औरंगाबाद : रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या, ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणास अडथळा निर्माण करणार्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी मार्किंग केले. मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या. सिटीचौक ते किलेअर्क रस्ता, मोंढा परिसरातील जाफर गेट, नारेगाव येथील सुखना नदीपात्रात मार्किंग करण्यात आले. अतिक्रमणधारकांना स्वतःहून आपली बांधकामे काढून घेण्यासाठी पालिकेने वेळ दिला आहे. त्यानंतर मनपा अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे.
सिटीचौक ते किलेअर्क या ३० मीटर रुंद डीपी रोडवरील अतिक्रमणे लवकरच हटवली जाणार आहेत. अतिक्रमणांमुळे या रस्त्यांच्या कामाची गती मंदावली आहे. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त-२ रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रोहिला गल्ली ते किलेअर्कदरम्यान असलेल्या अतिक्रमणांवर मार्किंग केले. तसेच नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या. तसेच जुना मोंढा येथील जाफरगेट येथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या सुशोभिकरणाच्या कामात काही अतिक्रमणे असल्याने तेथेही पाहणी करत पथकाने संबंधितांना नोटिसा देऊन अतिक्रमणे काढून घेण्यास बजावले.
मार्किंग करताना पथकात पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, नगररचनाचे उपअभियंता संजय कोंबडे, शाखा अभियंता कारभारी घुगे, स्मार्ट सिटीच्या स्नेहा बक्षी, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, आर. सुरासे यांची उपस्थिती होती.
या पथकाने नारेगाव येथील सुखना नदी पात्राचीही पाहणी केली. पात्रात सुमारे २० बाय ५० फुटांच्या आकाराचे पत्र्याचे शेड दिसून आले. तेव्हा शेडधारकास अतिक्रमण काढून घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली. पालिकेने सिटीचौक, जाफरगेट व नारेगाव सुखना नदी परिसरातील अतिक्रमणधारकांना स्वतःहून बेकायदा बांधकामे काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. त्यानंतर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.