पैठण : पदोन्नतीसह विविध प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा महसुल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या दोन दिवसीय सामुहिक रजा आंदोलनात पैठण तहसील कार्यालयातील कर्मचारी बुधवारी सहभागी झाले. तहसील कार्यालयात आज एकही कर्मचारी हजर नसल्याने प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय रजेमुळे पुढील सलग पाच दिवस तहसील कार्यालयातील कामकाज बंद पडणार असून सोमवारीच कार्यालयातील कामकाजास प्रारंभ होणार आहे.
पैठण तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यारी दि. २८ व २९ अशा दोन दिवसांची सामुहिक रजा टाकून आंदोलनात सहभागी झाले आहेत. ३० ऑक्टोबरला शुक्रवारी ईद असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. तर ३१ ऑक्टोबर रोजी शनिवार व १ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारीच पैठण तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे. सलग ५ दिवस प्रशासकीय कामकाज ठप्प राहणार असल्याने नागरिकांना मात्र विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
आज तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले असून यात असे म्हटले आहे की, औरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नतीबाबत व प्रलंबित विभागीय, फौजदारी खटल्यातील संबंधीत अधिकारी तहसिलदार , नायब तहसिलदार , अव्वल कारकुन , महसुल सहायक, वाहन, चालक , शिपाई , कोतवाल संवर्गातील अधिकारी कर्मचारी बाबत लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे बाबत शासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे व मागण्या मंजुर न केल्यामुळे दोन दिवसीय सामुहिक रजा आंदोलनात पैठण तहसील कर्मचारी सहभागी झाले असल्याचे म्हटले आहे. आंदोलनात पैठण तालुका महसूल संघटनेचे अध्यक्ष नारायण बंगले, उपाध्यक्ष सतिश घावट, यांच्यासह प्रमोद विघोतेकर, जीवन चव्हाण, एस.सी.घुनावत, श्रीमती सी.बी.कोल्हे, अरुण वादाडे, रविंद्र टोणगे, नितीन जाधव अशोक जाधव, बालाजी कांबळे, जी.सी.माळी, एस.एस.थोटे .वसुधा बागुल, हरिश शिंदे, संदिप शेळके, अमोल पाखरे, चरणसिंग राजपूत आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.