सिंगापूरच्या धर्तीवर मास्टर प्लॅन
By Admin | Published: July 16, 2016 01:00 AM2016-07-16T01:00:45+5:302016-07-16T01:17:37+5:30
औरंगाबाद : सिंगापूरने मागील काही वर्षांमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उपक्रमात बरीच आघाडी घेतली आहे. एका अमेरिकन कंपनीच्या मदतीने सिंगापूरने ही किमया केली
औरंगाबाद : सिंगापूरने मागील काही वर्षांमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उपक्रमात बरीच आघाडी घेतली आहे. एका अमेरिकन कंपनीच्या मदतीने सिंगापूरने ही किमया केली असून, ऐतिहासिक औरंगाबादेतही पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात अमेरिकन कंपनीचीच मदत घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली.
सिंगापूर येथे मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते. शनिवारी परिषदेतील माहिती विशद करताना बकोरिया म्हणाले की, सिंगापूर येथील तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. या तंत्रज्ञानाशी सांगड घालणे एवढे सोपे नाही. अफाट पैसा खर्च करून ते विविध योजना राबवीत असतात. पाण्याचा पुनर्वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे. अमेरिकेच्या ‘सीएचएमएल’या कंपनीने सिंगापूरमधील दूषित पाण्याचा पुनर्वापर चांगल्या पद्धतीने करून दिला आहे. कोट्यवधी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. ड्रेनेजचे पाणी पिण्यायोग्य तयार करण्यात आले आहे. आम्हीसुद्धा हे पाणी पिऊन बघितले. अमेरिकन कंपनीशी आपली चर्चा झाली असून, औरंगाबादेतही नैसर्गिक पाण्याचे स्रोत खूप आहेत. पाण्याचे स्रोत बळकट करणे आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मास्टर प्लॅन करण्यात येईल. सर्वेक्षण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी किती खर्च येईल, त्यासाठी पैसे कसे उभे करायचे हे ठरविता येणार आहे. हर्सूल तलावासह शहरातील काही विहिरींच्या पाण्याचा वापर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरात ३५० विहिरी आहेत. त्यातील ९९ मनपाच्या आहेत. सीएसआर आणि मनपा निधीतून या विहिरींची बांधणी करण्यात येईल.