दिवाळीत पथदिवे बंद दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा महापौरांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:31 PM2018-11-07T13:31:28+5:302018-11-07T13:33:05+5:30
: सोमवारपासून दिवाळीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद होते.
औरंगाबाद : सोमवारपासून दिवाळीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद होते. ‘लोकमत’ने सोमवारी यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळी महापालिकेत विद्युत विभागाचे कंत्राटदार, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दिवाळीत एकही पथदिवा बंद दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
शहरात ५५ हजारांहून अधिक पथदिवे आहेत. यातील १४ हजार पथदिवे दिल्ली येथील ‘इलेक्ट्रॉन’ कंपनीकडे सोपविण्यात आले आहेत. या पथदिव्यांची ८ वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती कंपनीकडेच सोपविण्यात आली आहे. शहरातील उर्वरित ४० हजारांहून अधिक पथदिव्यांचे दायित्व अद्याप मनपाच्या विद्युत विभागाकडे आहे. या पथदिव्यांच्या देखभालीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल २२ कंत्राटदार नेमले आहेत. दिवाळीत शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत.
यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले. जालना रोड, सेव्हन हिल, गजानन महाराज मंदिर आदी भागांत अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मंगळवारी सकाळी घोडेले यांनी घेतलेल्या बैठकीत नेहमीप्रमाणे मनपाचे उपअभियंता के.डी. देशमुख यांनी जबाबदारी झटकून कंपनीकडे अंगुलीनिर्देश केला. बैठकीत मनपाने नेमलेले विद्युत विभागाचे कंत्राटदारही उपस्थित होते. शहरातील सर्व पथदिवे सुरू ठेवणे हे मनपाचे काम आहे. दिवाळीत पथदिवे बंद असल्याचे निदर्शनास येताच संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.