करमाड येथील औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:42 PM2018-04-17T18:42:10+5:302018-04-17T18:50:21+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने सुरू असून, संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ते कामालाच उशीर होत आहे.
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने सुरू असून, संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ते कामालाच उशीर होत आहे. परिणामी संपूर्ण औषधी भांडार कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाने राज्याच्या मध्यवर्ती भागात राज्यस्तरीय औषधी भांडार स्थापन करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी विविध शहरांचे, गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर करमाड येथे औषधी भांडार उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी करमाड ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. चार औषधी भांडार कक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिओ व्हॅक्सीनच्या साठवणुकीसाठी किमान उणे १५ ते २५ तापमान असणे आवश्यक असते. त्यादृष्टीने औषधी भांडाराच्या इमारतीमध्ये पोलिओ व्हॅक्सीन स्टोअर राहणार आहे. अॅन्टी रेबीज सिरम, अॅन्टी रेबीज व्हॅक्सीनसह सर्व प्रकारच्या व्हॅक्सीनसाठी २ ते ८ तापमान असणे आवश्यक असते. यासाठी असे स्टोअर उभारण्यात येणार आहे. औषधी भांडारमध्ये थर्ड आणि फोर्थ जनरेशनच्या अॅन्टीबायोटिकच्या साठवणुकीसाठी कक्ष राहणार आहे. यासाठी येथे १४ ते २५ तापमान राहणार आहे.
याठिकाणी सलाईनसाठी एका स्टोअरचे नियोजन करण्यात आले आहे. पूर, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा पुरवठा कमीत कमी वेळेत करणे महत्त्वाचे ठरते. त्यादृष्टीने औषधी भांडाराच्या एका एकरमध्ये हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. दोन ते तीन टप्प्यात हे काम करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात औषधी भांडाराची उभारणी होईल. परंतु पहिल्या टप्प्यातील कामाला विलंब होत आहे.
१८ महिन्यांची मुदत
औषधी भांडाराच्या पहिल्या टप्प्यात ४.६४ कोटींच्या निधीतून संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ता, वॉटर टँकचे कामकाज केले जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदास वर्कआॅर्डर देण्यात आली. ११ जानेवारी २०१८ ते १० जुलै २०१९ अशा १८ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. परंतु तीन महिने उशिराने कामकाज हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुदतीत पूर्ण होणार
कंत्राटदारांकडून संरक्षक भिंती, कार्यालय इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १८ महिन्यांची मुदत आहे. त्यामुळे कामाला उशीर होणार नाही. मुदतीपूर्वीच काम पूर्ण होईल, असे जागतिक बँक प्रकल्प विभागाचे शाखा अभियंता एम. एम. आझमी म्हणाले.