औरंगाबाद : मेरठ येथील २००८ साली झालेल्या तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखेने बुधवारी (दि. २४ ) रात्री मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. शहरातील लोटा कारंजा भागात तो कापड विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री गुन्हे शाखेचे एक पथक शहरातील सिटी चौक व जिन्सी भागात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील २००८ साली झालेल्या तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपी समीउद्दीन कुरेशी (६० ) उर्फ शम्मी जैनुल अबदीन हा लोटा कारंजा येथे कापड विक्रीचा व्यवसाय करत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक मुधकर सावंत यांनी उत्तर पोलीस पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता, समीउद्दीन कुरेशी हा सुनील राजपाल धाक, सुधीर सुरेश पाल व पुनीत गिरी या तिघांच्या निर्घृण हत्या प्रकरणी मागील १० वर्षांपासून फरार असल्याचे सांगण्यात आले. यावरून गुन्हे शाखेने रात्रीच सापळा रचून लोटा कारंजा येथून कुरेशीला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे - घाडगे व सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोह गजेंद्र शिंगाने, सुभाष शेवाळे, पोना विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, पोकॉ सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, नितीन मुळे यांनी केली.
तिघांची केली होती निर्घुण हत्या आरोपी कुरेशी आणि इजलाल यांनी सुनील राजपाल धाक, सुधीर सुरेश पाल व पुनीत गिरी या तिघांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. यानंतर तिन्ही मृतदेहाचे तुकडे करून त्यांनी गोण्यामध्ये भरून हिंदन नदी पूल भागात कारमध्ये भरून सोडले होते. याप्रकरणी काही आरोपी जेलमध्ये आहेत मात्र कुरेशी १० वर्षांपासून फरार होता.