लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दुकान बंद करून शाहगंजमधून दुचाकीने घरी निघालेल्या तंबाखू व्यापा-याला भररस्त्यात शस्त्राचा धाक दाखवून सात लाख रुपयांहून अधिकची रोकड लुटण्यात आली. ही लुटमारीची घटना बुधवारी (दि.१८) रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास कैलासनगरजवळील मराठवाडा स्क्रॅप सेंटरसमोरघडली.व्यापारी विजय रमेश पिंपरिये (४८, रा. कैलासनगर) यांचे शाहगंज येथे साहील ट्रेडर्स हे दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून ते सात लाख रुपये बॅगमध्ये घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच-२०, ईएक्स-२३३३) घराकडे जात होेते. त्यांचा बारा वर्षीय मुलगा साहील त्यांच्या सोबत होता. ते जुना मोंढा येथून कैलासनगराकडे जात असताना मराठवाडा स्क्रॅप सेंटरसमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी त्यांच्या दुचाकीला धक्का मारला आणि हुज्जत घालण्यास सुरुवात केली. क्षणार्धात त्यांनी शस्त्र काढून त्याचा धाक दाखविला व त्यांच्या हातातील बॅग हिसकावून धूमठोकली.या घटनेनंतर पिंपरिये यांनी आरडाओरड केली. मात्र, त्यांच्या मदतीला कुणीच धावून आले नाही. त्या परिस्थितीत पिंपरिये यांनी मागून आलेला रिक्षा थांबवून त्यातून आरोपीचा पाठलाग केला; पण लुटारू तोपर्यंत सुसाट पळून गेले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, जिन्सी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शरद जोगदंड, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली.सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरूमराठवाडा स्क्रॅप सेंटरसह रस्त्यावरील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कोठे जेरबंद झालेत आहेत का याची पाहणी पोलिसांनी सुरू केली होती. आरोपींनी दुकानापासूनच पिंपरिये यांचा पाठलाग केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.
व्यापाऱ्याचे लुटले सात लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:28 AM