भरधाव टँकरने दुचाकीवरील वैद्यकीय विद्यार्थिनीस चिरडले; वडील थोडक्यात बचावले
By राम शिनगारे | Published: April 3, 2023 12:36 PM2023-04-03T12:36:08+5:302023-04-03T12:36:21+5:30
जोरदार धडकेत खाली पडल्यानंतर डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर: वडिलांसोबत कॉलेजला जात असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस भरधाव टँकरने चिरडल्याची घटना आज सकाळी महावीर चौकात घडली. दीक्षा मधुकर काळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
दीक्षा काळे एमजीएम फिजियोथेरेपी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. आज सकाळी वडील मधुकर काळे हे दीक्षाला कॉलेजमध्ये सोडण्यास दुचाकीवरून जात होते. दरम्यान, महावीर चौकात भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत वडील डाव्या बाजूला पडले, तर दिक्षा उजव्या बाजूला फेकली गेली. याचवेळी डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने दिक्षाचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने वडिल मधुकर काळे थोडक्यात बचावले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दीक्षा छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. लता मधुकर काळे यांची मुलगी होत. आज सायंकाळी छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.