औरंगाबाद : बनावट धनादेश आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून कॉर्पोरेट खातेदारांच्या बँक खात्यातून लाखो रूपये पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हेशाखेने आज पर्दाफाश केला.
या टोळीतील पाच जणांना मुंबईसह विविध ठिकाणाहून अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून पावणे दोन लाखाच्या रोकडसह संगणक, प्रिंटर, २७ एटीएम कार्ड, १५ मोबाईल, २६ बँकांचे धनादेश बुक, ९ रबरी शिक्के, निवडणूक कार्ड, पॅनकार्ड, नोटा मोजण्याचे यंत्र आणि एक कार असा सुमारे दहा लाखाचा ऐवज जप्त केला.
हरिष गोविंद गुंजाळ(३९,रा. मानगाव,नमसवाडी, ता.कुडाळ,जि.सिंधीदुर्ग), मनीषकुमार जयराम मौर्या उर्फ राकेश उर्फ मनीष रामलाल यादव उर्फ अमित रमेशसिंग(२३,रा.सिखडी,जि.भदोनी,उत्तरप्रदेश), मनदीपसिंग बनारसीदास सिंग(२९,रा. दिनानगर,जि.गुरूदासपुर,पंजाब), रशीद इम्तियाज खान (२०,रा. आसेवालनगर,नालासोपारा,ता.वसई, जि.पालघर) अआणि डब्ल्यू शेख अरमान शेख (३२,रा.कमलसागर, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, संदीप गुरमे,उपनिरीक्षक अनिल वाघ, हेमंत तोडकर, अफरोज शेख, कर्मचारी भाऊराव राठोड, नितीन मोरे, हिरा राजपूत, दत्तात्रय गढेकर, मनोज चव्हाण, शेख हकीम, भगवान शिलोटे, खरे,संतोष सुर्यवंशी, संजय खोसरे, नवाब शेख, विरेश बने, प्रमोद चव्हाण चालक ज्ञानेश्वर पवार यांनी ही कामगिरी केली.