‘एमआयएम देशासाठी धोका’- अबू आझमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:02 AM2018-05-04T00:02:34+5:302018-05-04T11:19:38+5:30
‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला.
औरंगाबाद : ‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. नांदेडहून हे कार्यकर्ते अनेक वाहनांनी औरंगाबादला पोहोचले होते.
सुभेदारी गेस्ट हाऊसवर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने झालेल्या पत्रपरिषदेत आझमी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नरेंद्र मोदी व भाजपच्या सध्याच्या वाटचालीवर त्यांनी सडकून टीका केली. कायदा नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही. जे भाजपबरोबर ते देशप्रेमी आणि जे नाहीत ते देशद्रोही, असे सध्या चालू आहे. नॉन इश्यूज् निर्माण करून हिंदू- मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला जात आहे. मुस्लिम आणि दलित समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. हे राष्ट्र हिंदूराष्ट्र होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे आझमी यांनी नमूद केले.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, अच्छे दिन कहाँ है? जे होते तेही चालले गेले. नोटाबंदीने कंबरडे मोडले. बेरोजगारी कमालीची वाढली. उन्नाव- कठुआसारख्या घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच. ज्यांच्यावर गंभीर आरोप होते, अशी मंडळी सरसकट सुटत आहे, ही चिंतेची बाब होय, असे आझमी यांनी नमूद केले.
भाजपला सशक्त पर्याय उभा झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण याबाबतीत काँग्रेस मनमानी करताना दिसत आहे. अखिलेश यादव यांना तर देशचे पंतप्रधान व्हायचे नाही. राहुल गांधी हेच दावेदार आहेत. त्यांनी खरे तर यात चांगला पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेसची नीती चांगली आहे. पण आता नियत खराब होत चालली आहे. सॉफ्ट हिंदुत्ववाद त्यांनी स्वीकारणे योग्य वाटत नाही. अमरसिंग यांच्यामुळे समाजवादी पार्टीचे नुकसान झाले. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ही व्यक्ती बरोबर नाही, अशी अनेक विधाने अबू आझमी यांनी यावेळी केली.
मकब-यात नमाज पढण्याची परवानगी द्या...
बीबीका मकबरा येथे नमाज पढू द्यायला हवे, अशी भावना आज आझमी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मकब-यालाही भेट दिली. त्यांनी सांगितले की, मकब-यात ३७५ जण नमाज पढू शकतात. ही परवानगी मिळायला हवी’