औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सुरूच आहेत. आता याप्रकरणाचा निषेध करत एमआयएमने आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्या शहरात एमआयएम रस्त्यावर उतरून राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करेल अशी माहिती खा. इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राजकीय मतभेद काहीही असू द्या, मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारे वादग्रस्त विधान आम्ही कधीही सहन करणार नसल्याचं खा. जलील म्हणाले. शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेते वादग्रस्त बोलत आहेत. राज्यपाल कोश्यारी जेव्हा महात्मा फुले यांच्यावर बोलले होते त्यावेळी विरोध केला असता तर आज त्यांची शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करण्याची हिम्मत झाली नसती. आम्ही आजपर्यंत शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला नाही. भाजप नेत्यांना महाराजांचे नाव घेण्याचे अधिकार नाही, असा सणसणीत टोला खा. जलील यांनी लगावला.
उद्या आम्ही शिवाजी महाराज यांच्या झालेल्या अपमानाबद्दल निदर्शने करणार आहोत. जर राष्ट्रवादी, कॉंग्रेस,शिवसेना, शिंदे सेना यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम, आदर असेल तर त्यांनी एकमताने राज्यपालांना परत पाठवण्याचा निर्णय एकमताने घेतला पाहिजे. एमआयएम देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करेल असं खा. जलील म्हणाले.